साकोली नगरपरिषदेने तो सोडवावा अशी मागणी
सेंदूरवाफा (Lake Canal) : शासनाची एखादी योजना कितीही चांगली असली परंतु त्यात योजनेचे व्यवस्थित नियोजन आखले गेले नसले तर एखाद्या चांगल्या योजनांची माती कशी होते याचे प्रत्यंतर अनेकदा दिसून येते. नंतर तीच योजना सरते शेवटी नागरिकांसाठी नेहमीची डोकेदुखी ठरते. ही डोकेदुखी ठरली आहे. साकोली येथील तलाव पाळीला लागून राहत असलेल्या सिव्हील वॉर्ड, गणेश वॉर्ड आणि तलाव वॉर्ड नागरिकांसाठी!
काही वर्षांपूर्वी एकोडी रोड ते (Lake Canal) तलाव वॉर्ड असा बायपास रस्ता तयार करण्यात आला. विशेष म्हणजे त्यापूर्वी तलावाची साधी पाळ होती. परंतु पावसाळ्यात वस्तीतील पाणी जाण्यासाठी सिमेंट कॅनल होते. कालांतराने हा रस्ता तयार करण्यात आला आणि (Lake Canal) सिमेंटच्या कॅनलची माती झाली. परंतु नव्याने रस्ता तयार करतांना पाळीच्या खालून पाणी जाण्यासाठी कॅनल न टाकल्याने वस्तीतून नाल्यांच्या माध्यमातून येणार्या पाण्याचा प्रवेश मार्ग बंद झाला. पावसाळ्यात पडणारा पाऊस तलावात जात नसल्याने तलाव पाळीच्या आसपास राहणार्या नागरिकांच्या घरात जात असते. पाणी पास व्हायला मार्ग नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते.
या पाण्यामुळे नागरिकांच्या घरातील अनेक घरगुती साहित्याचे नुकसान होत असते. पाणी एकाच ठिकाणी कित्येक दिवस राहत असल्याने डासांची निर्मिती होऊन जलजन्य आजाराला या परिसरात नेहमीच निमंत्रण मिळत असते. दरवर्षी या साचलेल्या दूषित पाण्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊन परिसरातील नागरिक आजारी पडतात. त्यानंतर त्यांना रुग्णालय गाठावे लागते. हा रस्ता तयार होऊन जवळपास ५ ते ६ वर्ष झालीत. परंतु दरवर्षी हा प्रश्न कायम असतो. पाळीच्या खालून पाणी जाण्यासाठी अंतर्गत कॅनल न टाकल्याने या परिसरातील नागरिकांसाठी ही दरवर्षीची डोकेदुखी ठरली आहे. परंतु हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणीही समोर येत नाही. निदान नगर परिषदने हा नेहमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.
‘तलाव पाळीवरील कॅनलचा (Lake Canal) प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रशासनाने या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन कॅनलची समस्या निकालात काढावी. पावसाळ्यात तलाव पाळीला लागून राहत असलेल्या परिसरात नेहमीच साचत असलेल्या पाण्यामुळे आरोग्याच्या प्रश्न निर्माण होतो. जोरदार पावसामुळे वस्तीच्या नाल्यांमधून येणारे पाणी पास होत नसल्याने नागरिकांच्या घरात शिरत असते. त्यामुळे घरगुती साहित्याचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. ज्या प्रशासनाच्या अखत्यारित हे काम येत असेल त्यांनी तात्काळ ही समस्या निकालात काढावी.’
-मनिष कापगते माजी नगरसेवक, साकोली.
‘नवीन रस्ता तयार होण्यापूर्वी या पाळीखालून तलाव वार्ड ते एकोडी रोड पर्यंत जवळपास ४ ते ५ सिमेंटचे कॅनल अंतर्गत पाणी जाण्यासाठी टाकलेले होते. नंतर या कॅनलची नवीन रस्ता तयार करतांना माती झाली. त्यामुळे पावसाळ्यात परिसरात अनेक दिवस पाणी साचून राहते. विश्वकर्मा मंदिर परिसराला लागून सार्वजनिक वापरात असलेली विहीर आहे. पावसाळ्यात पाणी पास होत नसल्याने गढुळ पाणी या विहिरीत जाते. ज्यामुळे नागरिकांसाठी वापरणे योग्य नसते.
सदर परिसर सार्वजनिक ठिकाण असल्याने येथे ज्येष्ठ नागरिक सायंकाळी आणि सकाळी विरंगुळा घालविण्यासाठी येतात. मात्र पाणी साचून राहत असल्याने दुर्गंधी निर्माण होऊन डासाच्या समस्येला केवळ जेष्ठ नागरिकच नव्हे तर या संपूर्ण परिसरातील नागरिकांना सामोरे जावे लागते. अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला तलाव पाळीचा प्रश्न का मार्गी लागत नाही?’
सचिन घोनमोडे, शहर अध्यक्ष, शिवसेना शिंदे गट