लातूर (Latur Floods) : सलग दुसऱ्या दिवशी लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपले. लातूर जिल्ह्यात सरासरी 91.8 मी पाऊस नोंदला गेला असून जिल्ह्यातील 36 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टी व पुरामुळे तसेच वीज कोसळून जिल्ह्यामध्ये 27 जनावरे मृत्युमुखी पडली तर 605 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. जिल्ह्यात 116 घरांची पडझड झाली. जिल्ह्यात सर्वत्र (Latur Floods) पूर परिस्थिती निर्माण झाली असून जवळपास 65 मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील एका तालुक्याचा दुसऱ्या तालुक्याशी संपर्क तुटला आहे.
ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरी 189.6 मिमी पर्जन्यमानाच्या तुलनेत प्रत्यक्षात 336.0 मिमी पाऊस झाला आहे. दि. 1 जूनपासून आतापर्यंतचा पाऊस अपेक्षित सरासरी 511.9 मिमी पर्जन्यमानाच्या तुलनेत 107.3 टक्के म्हणजेच 549.2 मिमी इतका पाऊस झालेला आहे. लातूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी (जून ते सप्टेंबर) 706.0 मिमीच्या तुलनेत 77.8% इतक्या पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 60 पैकी 36 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
अतिवृष्टी, पूर (Latur Floods) आणि वीज कोसळून अशा दुर्घटनांमध्ये जिल्ह्यात 27 जनावरे दगावली. त्यात गाय व म्हशी 17, वासरे 7, बैल 2 व 1 बकरी यांचा समावेश आहे. पावसामुळे 605 कोंबड्याही दगावल्या. लातूर येथे 7 घरांची अंशतः पडझड झाली. अहमदपूर तालुक्यात 2 व इतर ठिकाणी अशी जिल्हाभरात 116 घरांची पडझड झाली.




