उदगीर (Latur) :- मागच्या खरीप हंगामात उदगीर तालुक्यात जवळपास सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी (heavy rain) झाली होती. त्यामुळे, सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचा क्लेम, ७२ तासाच्या आत पीकविमा कंपनीकडे केला होता. त्यांनाच आता पीकविमा मिळणार असल्याची माहिती पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ‘देशोन्नती’शी (Deshonnati) बोलताना दिली आहे.
‘क्लेम’ केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार पीकविमा
उदगीर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानीचा क्लेम ७२ तासाच्या आत केला होता, त्यांनाच पीकविमा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. पण, क्लेम करूनही पीकविमा कंपनीने त्यांच्या नुकसानीचा पंचनामा केला नव्हता, अशा शेतकऱ्यांचे काय होणार.? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रत्येक वर्षी पीकविमा कंपनीकडून उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. स्वतः नियम न पाळणाऱ्या विमाकंपनीकडून पीकविमा देताना मात्र नियमावर बोट ठेवले जात आहे. पीकविमा कंपनीच्या धोरणाचा उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे असून शेतकऱ्यांच्या नजरा आता राजकीय पुढाऱ्यांच्या भूमिकेकडे लागल्या आहेत.
११६ मिमी झाला होता पाऊस
६४.५ ते ११५.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर, अतिवृष्टी झाली असा त्याचा अर्थ होतो. आणि उदगीर तालुक्यात सरासरी ११६.५ मिमी पाऊस पडल्याने शेतातील सर्वच पिके पाण्यात बुडाली असल्याचे चित्र दिसून आले होते. पीकविमा कंपनीकडे तसा क्लेम करणे आवश्यक होते. तरच, पीकविमा मिळण्यासाठी शेतकरी पात्र ठरणार असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार पीकविमा मिळण्यासाठी, प्रत्येक पीकविमा भरलेल्या शेतकऱ्याने पीकविमा कंपनीच्या ॲपवर जावून जास्त पावसाने नुकसान झाले आहे असा क्लेम केला होता. पण, ४८ तासात पीकविमा कंपनीकडून त्याचा पंचनामा होणे बंधनकारक होते. पण, तसे न करता विमा कंपनीने मोजक्याच काही शेतकऱ्यांच्या शेतात जावून पंचनामा केला होता.
‘क्लेम’ करणारे शेतकरी, होणार पात्र…
ज्यांनी नुकसानीचा क्लेम केला होता, त्यांनाच यंदाचा पीकविमा मिळणार आहे. आगामी पंधरा दिवसात पैसै पडायची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे शक्य नसल्याने त्यावेळी, प्रत्येक गावातील सरासरी २५ टक्के शेतकऱ्यांचा पंचनामा केला होता. त्यावरून सर्व क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार असल्याचे पीकविमा कंपनीचे अधिकारी राज पाटील यांनी दैनिक देशोन्नतीशी बोलताना सांगितले आहे.