Gondia:- मिलिंद विद्यालय कनिष्ठ कला महाविद्यालय चान्ना/ बाक्टी येथे दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी विद्यार्थ्यांना ‘सायबर क्राईम म्हणजे काय? व मोबाईल हाताळताना विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी’ या विषयावर पोलीस ठाणे अर्जुनी मोर येथील उपनिरीक्षक सुशील नलावडे यांचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे मा.प्राचार्य मधुकर रामटेके, प्रा.राजन बोरकर पर्यवेक्षक मिलंद रामटेके, गिरीष बोरकर, मंगेश दोनोडे, ईश्वर भोवते, तारक माटे, सुनील पातोडे, देवानंद तरोने, उषाताई लांडगे, शिवानी रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.
मोबाईल हाताळताना विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी
सुशील नलावडे यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक माध्यमांचा वापर मुळीच करू नका, तसेच अभ्यासाची तयारी म्हणून कधी व्हाट्सअप(Whatsapp), फेसबुक(Facebook), इंस्टाग्राम(Instagram) व टेलिग्राम यासारख्या माध्यमांचा वापर करीत असल्यास अत्यंत काळजीपूर्वक या माध्यमांचा वापर करावा, असे सांगितले. यासोबतच नलावडे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रासंगिक उदाहरणांच्या माध्यमाने सायबर क्राईम कशा प्रकारे केले जातात, हॅकर्स आपल्या भोळेपणाचा फायदा घेत कशाप्रकारे आपल्याला गंडवितात, तसेच विशिंग, फिशिंग यासारख्या बाबींविषयी अत्यंत सखोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याला भविष्यात स्वतःचे करिअर घडवायचे आहे. यामुळे मोबाईल पासून दूरच राहण्याचा सल्ला दिला. मोबाईलच्या वापराने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारे सामाजिक, आर्थिक व मानसिक त्रास याबद्दल माहिती दिली व विद्यार्थ्यांनी दोन वर्ष मोबाईल पासून दूर राहत शिक्षकांचे, शाळेचे व आई-वडिलांचे नाव मोठे करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गिरीष बोरकर प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्राध्यापिका माटे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता प्रार्थना’ या गीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.