असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सचा अहवाल
नवी दिल्ली/ मुंबई (MP-MLA Defection) : तब्बल 111 विद्यमान खासदार आणि आमदारांनी पक्ष बदलल्याचे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि नॅशनल इलेक्शन वॉचच्या विश्लेषणातून समोर आले आहे. या 111 जणांमध्ये 26 लोकसभा खासदार, सात राज्यसभा खासदार आणि 78 आमदारांचा समावेश आहे. (MP-MLA Defection) पक्षांतर केलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये सर्वाधिक 32 जण नागालँडमधील आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 20, तेलंगणात नऊ, तर गोवा आणि पंजाबमध्ये प्रत्येकी आठ जणांनी पक्ष बदलला. एडीआरच्या मते, या प्रकरणांमध्ये केवळ वैयक्तिक पक्षांतरच नाही, तर पक्षविलीनीकरण, राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढविणे आणि अपात्र ठरल्यानंतर पोटनिवडणुकीत पुन्हा निवडून येणे, अशा प्रकारांचाही समावेश आहे.
या 111 लोकप्रतिनिधींपैकी 29 जण म्हणजेच 26 टक्के जण भाजपमध्ये दाखल झाले. यामध्ये सात (MP-MLA Defection) राज्यसभा खासदार आणि 22 आमदारांचा समावेश आहे. या विश्लेषणातील एकही लोकसभा खासदार भाजपमध्ये गेल्याचे आढळले नाही. सातही राज्यसभा खासदार यापूर्वी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, सर्वाधिक लोकप्रतिनिधी स्वीकारणाऱ्या पक्षांच्या यादीत नागा पीपल्स फ्रंट (NPF) 32 जणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. एडीआरने स्पष्ट केले आहे की, एनपीएफच्या या संख्येमागे 2025 मधील एनडीपीपी-एनपीएफ विलीनीकरणाचा मोठा वाटा आहे. त्यानंतर भाजप 29 आणि नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) 20 लोकप्रतिनिधींसह पुढे आहेत.
पक्षांतर कुठून झाले?
एनडीपीपीमधून 25, तृणमूल काँग्रेसमधून 20 आणि काँग्रेसमधून 19 लोकप्रतिनिधींनी पक्ष बदलला. या तिन्ही (MP-MLA Defection) पक्षांतील पक्षांतरांची संख्या मिळून 111 पैकी 64 म्हणजेच 58 टक्के आहे.