कौटुंबिक वादातून वीट मारून घेतला जीव; प्रणय चौधरी पोलिसांच्या ताब्यात
विरुळ आकाजी (Father Brutal murder) : वर्धा जिल्ह्यातील विरुळ आकाजी येथे तान्हा पोळा सणाच्या उत्साहाला कौटुंबिक वादातून झालेल्या हत्येने गालबोट लागले. मुलगा प्रणय चौधरी याने वडील परमेश्वर चौधरी यांच्यावर वीट मारून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास घडली. परमेश्वर चौधरी आणि त्यांच्या पत्नीचे पटत नसल्याने पत्नी मुलगा प्रणय व मुलगी यांच्यासह रसुलाबाद येथे राहत होती. परमेश्वर यांना यापूर्वी एका खुनाच्या प्रकरणात शिक्षा झाली होती. (Father Brutal murder) शिक्षा पूर्ण केल्यानंतर ते विरुळ येथे राहत होते. दरम्यान, त्यांच्या एका महिलेशी संबंध असल्याने कुटुंबात वारंवार कलह होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुलांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता.
शुक्रवारी काही कारणास्तव प्रणय विरुळ येथे आला असता त्याची वडिलांशी भेट झाली. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर प्रणयने परमेश्वर यांच्यावर हात उगारला. त्यानंतर बाजूला पडलेली वीट उचलून मारहाण केली. यात गंभीर दुखापत झाल्याने परमेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला. (Father Brutal murder) घटनेची वार्ता गावात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. तान्हा पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेने सणाच्या उत्साहावर विरजण पडले.
घटनेची माहिती मिळताच पुलगाव उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखैळे, ठाणेदार ढाकणे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. वर्धा जिल्ह्यातील अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची तपासणी करून पुरावे संकलित केले. (Father Brutal murder) पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुलगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आला. प्रणय चौधरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पुलगाव पोलिस करीत आहेत.