खुलताबाद येथील दांडेकर दाम्पत्याची अनोखी संकल्पना
खुलताबाद (khultabad Ganeshotsav) : दरवर्षीप्रमाणे यंदाही खुलताबाद येथील डॉ. दांडेकर (Dr. Atul Dandekar) दाम्पत्याने ‘अनाथांचा नाथ’ या संकल्पनेवर आधारित घरगुती गणपतीचा सादर केला देखावा. अनाथ मुलांमध्ये उत्तम बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि मोठी स्वप्ने असतात; मात्र त्यांच्या आयुष्यात आई-वडिलांच्या मायेचा आणि आधाराचा अभाव असतो. याच भावना, अपूर्ण स्वप्ने आणि मायेची आस या देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न दांडेकर दाम्पत्याने केला आहे.
‘बाप्पा हा प्रत्येकाचा आहे. ज्यांना आई-वडिलांचा आधार नाही, त्यांच्यासाठी बाप्पा मायेचा आधार बनू शकतो,’ असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. या संकल्पनेचा एक भाग म्हणून अनाथ आश्रमातील मुलींना विशेष आमंत्रित करण्यात आले. त्यांच्या हस्ते गणपती बाप्पाची पहिली आरती करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी (khultabad Ganeshotsav) अनाथ आश्रमातील मुलींना अन्नदान व वस्त्रदान करण्यात आले, तसेच शालेय साहित्याचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमातून समाजात माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाडूच्या मातीची मूर्ती साकारून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यात आला आहे. ‘ज्यांना जगाने सोडले, त्यांना बाप्पाने जवळ केले,’ हीच ‘अनाथांचा नाथ’ या संकल्पनेमागील भावना असल्याचे डॉ. अतुल दांडेकर (Dr. Atul Dandekar) यांनी सांगितले.
मागील वर्षी वेरूळ लेण्यांचा देखावा
डॉ. अतुल दांडेकर व डॉ. दिपाली दांडेकर (Dr. Dipali Dandekar) या दाम्पत्याने मागील वर्षी (khultabad Ganeshotsav) घरगुती गणपती समोरील देखाव्यातून जगप्रसिद्ध वेरूळ लेणीच्या संवर्धनाचा संदेश दिला होता. त्यांनी गणेश भक्तांना थेट कैलास लेणीत घेऊन जात कैलास लेणीची कथा आणि व्यथा या देखाव्यातून मांडली होती. 'वेरूळ लेणीचे संवर्धन आणि जतन करण्याची आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. जागतिक वारसा जपला पाहिजे. लेण्यांची हानी रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असा संदेश त्यांनी दिला होता.