महाराष्ट्र कुष्ठरोग शोधमोहिम

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign

मुंबई/ अकोला (Maharashtra Leprosy Detection Campaign) : महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. 2015-16 ते 2025-26 या कालावधीत राज्यात 1 लाख 57 हजार 269 नवीन कुष्ठरुग्णांचे निदान झाले आहे. यापैकी कुष्ठरोग शोधमोहीम तसेच एसीडीआरएसच्या माध्यमातून तब्बल 44 हजार 367 रुग्णांचा शोध घेण्यात आला.

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत (Maharashtra Leprosy Detection Campaign) उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत शोधमोहिमेद्वारे आढळणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने मोठी राहिली आहे. त्यामुळे कुष्ठरोगाच्या प्रतिबंधासाठी अधिक व्यापक तपासणी आणि जनजागृतीची गरज अधोरेखित होत आहे.

कुष्ठरोगाची माहिती देणे आता बंधनकारक

कुष्ठरोगाचा प्रसार वेळीच रोखण्यासाठी राज्य सरकारने 30 ऑक्टोबर 2025 पासून कुष्ठरोगाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार शासकीय तसेच खासगी रुग्णालये, अशासकीय संस्था आणि खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना निदान झालेल्या प्रत्येक कुष्ठरुग्णाची माहिती आरोग्य विभागाला देणे आवश्यक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कुष्ठरुग्णांची अचूक नोंद ठेवणे, त्यांच्यापर्यंत उपचार पोहोचविणे आणि रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे अधिक सुलभ होणार आहे.

रुग्ण शोधणाऱ्या आशा सेविकांना मानधन

ग्रामीण आणि दुर्गम भागात कुष्ठरुग्णांचा शोध (Maharashtra Leprosy Detection Campaign) घेण्यासाठी आशा स्वयंसेविकांची महत्त्वाची भूमिका आहे. नवीन रुग्ण शोधणे तसेच रुग्णाचा उपचार पूर्ण करून घेण्यासाठी त्यांना शासनाकडून प्रोत्साहनपर मानधन दिले जाते. विकृती नसलेला नवीन कुष्ठरुग्ण आढळल्यास आशा स्वयंसेविकेला 250 रुपये, तर विकृती असलेला नवीन रुग्ण शोधल्यास 200 रुपये दिले जातात. याशिवाय सांसर्गिक रुग्णाचा उपचार पूर्ण करून घेतल्यास 600 रुपये, तर असांसर्गिक रुग्णाचा उपचार पूर्ण केल्यास 400 रुपये मानधन देण्यात येते.

विकृतीवरील शस्त्रक्रियेसाठी 5 हजारांचे अनुदान

कुष्ठरोगामुळे हात-पाय किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये निर्माण झालेल्या विकृती दूर करण्यासाठी पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेला शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. अशा शस्त्रक्रियेसाठी 5 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे. तसेच स्वयंभू कुष्ठवसाहतींमध्ये रुग्णांच्या जखमांवर ड्रेसिंग करणाऱ्या ड्रेसरला वाढीव मानधन देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

शोधमोहिमेत वर्षानुसार आढळले रुग्ण

कुष्ठरोग शोधमोहिमेच्या (Maharashtra Leprosy Detection Campaign) आकडेवारीवर नजर टाकल्यास काही वर्षांत रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते. 2015-16 मध्ये 166 रुग्ण आढळले होते. त्यानंतर 2016-17 मध्ये 4134, 2017-18 मध्ये 5073, 2018-19 मध्ये 5268आणि 2019-20 मध्ये 6116 रुग्ण आढळले. कोरोना कालखंडानंतरही रुग्ण शोधमोहीम सुरू राहिली. 2022-23 मध्ये 6731, तर 2023-24 मध्ये 6744 रुग्णांची नोंद झाली. 2025-26 मध्ये शोधमोहिमेदरम्यान 6309 नवीन रुग्ण आढळले.

निर्मूलनासाठी नियमित तपासणीची गरज

कुष्ठरोगावर प्रभावी उपचार उपलब्ध असले तरी रोगाचे लवकर निदान आणि उपचार पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मोठ्या संख्येने नवीन रुग्ण आढळत असल्याने ग्रामीण व दुर्गम भागात तपासणी, जनजागृती आणि उपचारांची उपलब्धता वाढविण्यावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.