आमदार अंबादास दानवे

अंबादास दानवे  यांनी केली दुष्काळग्रस्त भागाची पाहणी 

MLA Ambadas Danve: पावसाने पाठ फिरवल्याने रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे गंभीर संकट ओढवले आहे. शेतातील उभी पिके करपून गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून..

अंबादास दानवे  यांनी केली दुष्काळग्रस्त भागाची पाहणी 

MLA Ambadas Danve

 

करपलेल्या पिकांची पाहणी; शेतकऱ्यांशी संवाद
एकरी ५० हजार रुपये सरसकट मदतीची प्रमुख मागणी

रिसोड (MLA Ambadas Danve) : पावसाने पाठ फिरवल्याने रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे गंभीर संकट ओढवले आहे. शेतातील उभी पिके करपून गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून, या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादासजी दानवे (MLA Ambadas Danve) यांनी  तालुक्यातील मांगवाडी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी दौऱ्याला सुरुवात केली.

मांगवाडी परिसरातील शेतांमध्ये जाऊन त्यांनी करपलेली पिके, पावसाअभावी झालेली शेतीची दुरवस्था आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या व्यथा, अडचणी आणि शासनाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या.

एकरी ५० हजार रुपये सरसकट मदत द्यावी!

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानीचे किचकट निकष न लावता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये सरसकट आर्थिक मदत द्यावी, ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पीकविमा नुकसानभरपाई, दुष्काळी उपाययोजना आणि शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

उद्धव ठाकरे यांच्या शेतकरीविषयक कामाचे ग्रामस्थांकडून कौतुक

यावेळी ग्रामस्थांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात राबविण्यात आलेली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायी ठरल्याचे ग्रामस्थांनी आवर्जून सांगितले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या विविध कामांचेही ग्रामस्थांनी कौतुक केले. तसेच सध्याच्या सरकारच्या शेतकरीविषयक धोरणांबाबत शेतकरी व शेतमजुरांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे ग्रामस्थांनी व्यक्त केले, तसेच सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे, जिल्हा संघटक गजानन देशमुख, वाशिम नगर परिषदेचे गटनेते गजानन दहात्रे, रिसोड विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख डॉ. चंद्रशेखर देशमुख, रिसोड विधानसभेचे सहसंपर्कप्रमुख विश्वनाथ सानप, तालुकाप्रमुख घनश्याम मापारी, रिसोड तालुका समन्वयक नारायणराव आरू, रिसोड शहरप्रमुख संजुभाऊ इरतकर, रिसोड तालुका संघटक आनंद कुळाल, गणेश देशमुख, डॉ. गजानन सानप, कैलास ठोकरे, धनंजय माळेकर, शंकर रेखे, शिवाजी सोनुने, रामू रंजवे, कैलास इप्पर, प्रदीप देशमुख, किशोर काळे, दिलीप चोपडे, आनंदा काळे, रामहरी सावके यांच्यासह मांगवाडी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टैग्स: MLA Ambadas Danve