हिंगोली (Hingoli Railway Bridge Problem) : शहरातील खटकाळी रस्त्यावरील नवीन भूमीगत रेल्वे पुलाखाली पावसाचे पाणी साचून वाहतुकीला खोळंबा होत होता. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले होते. यासाठी मुंबईचे पथक दाखल झाले असून भूमीगत रस्त्यातील पाणी काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. शासनाच्या वतीने मागील काही वर्षापुर्वी खटकाळी रस्त्यावर भूमीगत रस्ता तयार करण्यात आला होता. या रस्त्यावरून पोलिस वसाहत, राज्य राखीव पोलिस बल व इतर नवीन वसाहतीमधील नागरीकांची नेहमीच ये-जा सुरु असते. सध्या पावसाळा सुरु आहे.
या (Hingoli Railway Bridge Problem) भूमीगत पुलाखाली पावसाचे पाणी जमा होत असल्याने वाहतुक करताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्या संदर्भात दैनिक देशोन्नतीमध्ये ८ ऑगस्टला सचित्र वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर बोगद्यातील पाणी काढण्या करीता मुंबई येथून पथक दाखल झाले आहे. साचलेल्या पाण्यासह जमा झालेला चिखल काढण्याचे काम देखील युध्द पातळीवर सुरु आहे. हे काम सुरु असले तरी एका बाजूने वाहतुक व्यवस्था चालूच आहे.