आरमोरी/ गडचिरोली (Bhik Mango Andolan) : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील थोटेबोडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहाराचा साठा संपल्याने विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून पोषण आहाराचा पुरवठा आणि टेंडर प्रक्रिया रखडल्याच्या निषेधार्थ शाळेचे शिक्षक नंदकुमार (नंदकिशोर) मसराम यांनी मंगळवार २८ जुलै पासून शाळेसमोरच 'भीक मांगो' आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांना उपाशी ठेवण्यापेक्षा स्वतः गावात भीक मागून अन्नधान्य गोळा करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरत आहे.
थोटेबोडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. शाळेत सुमारे ८१ ते ८५ विद्यार्थी असून त्यांची जबाबदारी केवळ एका शिक्षकावर आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळपास महिना उलटला असतानाही (Bhik Mango Andolan) पोषण आहारासाठी आवश्यक टेंडर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने मध्यान्ह भोजन योजना ठप्प झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न गंभीर बनताच शिक्षक नंदकुमार मसराम यांनी शासनाकडे केवळ मागणी न करता स्वतःच पुढाकार घेतला. ते दररोज सकाळी गावात फिरून धान्य, भाजीपाला आणि इतर आवश्यक साहित्य भिक्षा स्वरूपात गोळा करतात. त्यानंतर याच साहित्यापासून विद्यार्थ्यांसाठी दुपारचे भोजन तयार केले जाते. शासनाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत विद्यार्थ्यांच्या ताटात अन्न पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न अनेकांना भावनिक करणारा ठरत आहे.
शालेय पोषण आहार योजना विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा, शाळेतील उपस्थिती वाढावी आणि कुपोषणावर नियंत्रण मिळावे या उद्देशाने राबविली जाते. मात्र, टेंडर प्रक्रियेतील दिरंगाईमुळे अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये ही योजना अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण, गरीब आणि आदिवासी विद्यार्थ्यांना बसत आहे.
एका दिवसाच्या भोजनाची झाली सोय
विशेष म्हणजे, थोटेबोडी येथील ही जिल्हा परिषद शाळा नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्ह्यात ओळखली जाते. एकमेव शिक्षक विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण देतात. डिजिटल व स्मार्ट वर्ग, शाळेतच अभ्यास पूर्ण करून घेण्याची संकल्पना, तबला, हार्मोनियम, चित्रकला यांसारख्या कलांचे प्रशिक्षण तसेच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये नवोदय परीक्षेची तयारी अशा विविध उपक्रमांमुळे ही (Bhik Mango Andolan) शाळा आदर्श शाळा म्हणून प्रसिद्ध आहे. शिक्षकाने सुरू केलेल्या भिक मागो आंदोलनामुळे आजच्या भोजनाची सोय झाली. मात्र उद्याचे काय असा प्रश्न कायमच आहे.