हिंगोली (Vaishya Vani Caste Certificate) : राज्यातील वैश्य वाणी समाजासाठी महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी एक अत्यंत महत्त्वाचे शासन परिपत्रक जारी केले आहे. वैश्य वाणी जातीबाबत असलेला संभ्रम दूर करण्यात आला आहे.
शासनाने या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की, १ मार्च २०१४ च्या शासन निर्णयानुसार राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवाल क्र. ४४ व ४५ मधील शिफारशीनुसार वैश्यवाणी या जातीचा समावेश इतर मागासवर्ग यादीत करण्यात आलेला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदू-वाणी, हिंदू-वैश्य किंवा हिंदू-वैश्यवाणी अशा वेगवेगळ्या नोंदी आढळत असल्याने जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात मोठ्या अडचणी येत होत्या.
या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाने मार्च २००८ मध्ये सादर केलेल्या अहवाल क्रमांक २३ चा आधार घेत शासनाने हे स्पष्टीकरण दिले आहे. त्या अहवालानुसार हिंदू-वाणी, हिंदू-वैश्य आणि हिंदू-वैश्यवाणी या तिन्ही जाती वैश्यवाणीच आहेत आणि त्यामध्ये कोणताही फरक करण्याचे कारण नाही. अज्ञानामुळे किंवा नजर चुकीने जातीच्या रकान्यात अशा वेगवेगळ्या नोंदी झाल्या असल्याचे आयोगाने निरीक्षण नोंदवले असून हा अहवाल उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तयार करण्यात आला आहे.
त्यानुसार शासनाने सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना आदेश दिले आहेत की, ज्या व्यक्तींच्या रक्त नात्यातील व्यक्तीच्या दाखल्यावर हिंदू-वाणी, हिंदू-वैश्य किंवा हिंदू-वैश्यवाणी यापैकी कोणतीही नोंद असेल तर त्यांना वैश्यवाणी आहेत असे समजून वैश्यवाणी जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे. तसेच ज्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर केवळ हिंदू असा उल्लेख असेल परंतु त्यांच्याकडे जन्म मृत्यू रजिस्टर किंवा मालमत्ता रजिस्टर सारख्या इतर कागदपत्रांवर वैश्य, वाणी किंवा वैश्यवाणी अशी नोंद असेल तर त्यांनाही वैश्यवाणी समजून प्रमाणपत्र देण्यात यावे.
सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.या निर्णयामुळे राज्यभरातील वैश्य वाणी समाजाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जात प्रमाणपत्राचा प्रश्न निकाली निघणार आहे.