अनेक विद्यार्थिंनीचे पोलिसांनी नोंदविले जबाब
सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेण्याच्या हालचाली
हिंगोली (Student molestation case) : कळमनुरी तालुक्यातील येडशी तांडा येथील भोजाजी नाईक आश्रम शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थिंनीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुरुवारी पोलिसांनी अटक केलेल्या मुख्य आरोपीला शुक्रवारी हिंगोली न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
येडशी तांडा येथील वस्तीगृहात शिक्षक महालिंग पटवे याने (Student molestation case) विद्यार्थिंनीचा विनयभंग केल्याची घटना उघड झाल्याने या प्रकरणात आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये गुन्हा दाखल होताच मुख्य आरोपी शिक्षक महालिंग विश्वनाथ पटवे हा फरार झाला होता. परंतु घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांनी दिलेल्या सुचनेवरून उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे यांनी मुख्य आरोपीच्या तपासासाठी पथके रवाना केली होती. यामध्ये १५ ऑक्टोबर रोजी शाळेतील अधिक्षक मोहन जाधव याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या दरम्यान त्याच्या जामीनसाठी अर्ज दाखल केला असता त्याची जामीवर सुटका करण्यात आली होती.
१६ ऑक्टोबर रोजी महालिंग पटवे हा आखाडा बाळापूर येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, पोलिस उपनिरीक्षक गणेश गोटके, शेख अन्सार, शिवाजी पवार, शेख बाबर, राजु घोंगडे, परमेश्वर सरकटे यांनी तात्काळ महालिंग पटवे याला ताब्यात घेतले.
१७ ऑक्टोबर रोजी महालिंग पटवे याला हिंगोली येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता १८ ऑक्टोबर पर्यंत एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान या (Student molestation case) प्रकरणात तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या पथकाने आश्रम शाळेमध्ये जावून विद्यार्थिंनीचे जबाब नोंदविले. त्यामध्ये बहुतांशी विद्यार्थिंनीनी या घटनेला दुजोरा दिला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिसांनी गतिमान केला असून आता वस्तीगृहातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेण्याकरीता पोलिसांनी हालचाली सुरु केल्या आहेत.