मानोरा (Manora) : प्रत्येक काळात मोजक्या का होईना पण स्त्रियांनी लिहिले आहे. आता तुमच्या मनात जे आहे ते बिनधास्त लिहा. काही विषयावर स्पष्टपणे बोलले जात नाही. उदाहरणार्थ वेश्यांचे प्रश्न, बालकामगारांचे (Child Labour) प्रश्न, गे आणि हिजड्यांचे प्रश्न, लिव्ह इन रिलेशनशिप, स्त्रियांची वाढती व्यसनाधीनता आदी. लिहिण्यासाठी फिरले पाहिजे अनुभवले पाहिजे व वाचले पाहिजे. वाचाल तर लिहाल आणि बोलाल. अशा आशयाचे उद्गार डॉ. लीना निकम यांनी काढले.
धामणी मानोरा येथे जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लेखिका संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. सावित्री जिजाऊ (Savitri Jijau) दशरात्रोत्सवा अंतर्गत 5 जानेवारीला लेखिका संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. लीना निकम पुढे म्हणाल्या पुरुषांकडून स्त्रियांवर अन्याय झाला म्हणून आता पुरुषांवर अन्याय करत सुटणेही वाईटच. निर्व्यसनीपणा (Addiction) ही स्त्रीची खरी संपत्ती आहे. आपण कुठल्याही सन्मानाच्या पदावर असू पण आपली खरी ओळख लेखक (Author) म्हणून आहे. आपल्या जवळ सत्ता नाही पण लेखणीचे हत्यार आहे. ते समाज मनावर प्रभाव गाजवण्याचे महत्त्वाचे साधन आहे.
बालकांचे भावविश्व समजून घेण्याची स्त्रीला नैसर्गिक देण आहे. त्याचा लेखनात उपयोग केला पाहिजे स्त्रियांचे नाट्यलेखन (Playwriting by Women) अत्यल्प आहे. ते वाढले पाहिजे. आज काळ बदलला आहे. आपण हाताने लिहीत होतो आता तोंडाने लिहितो, मोबाईलवर टाईप करतो. प्रसार माध्यमांनी आपल्या भावनाही हॅक आणि कर्पट केल्या. माध्यमाने केवळ आपल्या विचारांवरच नव्हे तर आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवले आहे. भावनांच्या विसंगतीतून आपली संवेदनशीलता हरवत चालली आहे. लेखिका म्हणून खरी भावना व्यक्त करण्याची ताकद आपण हळूच गमावुन बसतो आहे. कृत्रिम संवेदनशीलता (Artificial Sensitivity) जेव्हा आपल्या आयुष्यात प्रवेश करते तेव्हा आपण लेखिका म्हणून खरी भावना व्यक्त करण्याची ताकद हरवुन बसतो. ज्या भावना लेखिकांनी कधी अनुभवल्या नाहीत किंवा आतून उमलून आल्या नाहीत त्यावर आपण लिहिले तर आपले लिखाण केवळ एक ट्रेंड म्हणून लोकप्रियतेसाठी (Popularity) राहील. ते शाश्वत असणार नाही.
आजच्या लेखनावर तत्कालीन घटकांचा इतका प्रभाव आहे की, लेखक कालातीत मूल्यावर कमी आणि तत्कालीन घटनांवर अधिक लक्ष केंद्रित करतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (Artificial Intelligence) दिलेले शब्द फक्त आपण वापरत नाही तर एआय सारखे मेंदू गहाण ठेवून वागतोय याविषयी अंतर्मुख होऊन विचार करण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे लेखन फक्त व्हायरल होते सर्व्हायव्हल राहत नाही. लेखन जर आपण आपले अपत्य समजत असू तर आपल्या आपत्यावर संस्कार महत्त्वाचे आहेत. अपत्यावर आपण संस्कार करतो तसेच संस्कार लेखनावर (Ritual Writing) व्हायला पाहिजेत. ते पुन्हा-पुन्हा तपासून पहायला हवे.
बोलीभाषांची जतन (Preservation of Dialects) संवर्धन करणे काळाची गरज आहे. आपले लेखन मनोरंजनाचे साधन नसून समाजाच्या अंतकरणाचा आरसा असले पाहिजे. लेखणी फक्त कलात्मक अभिव्यक्ती नसून ती समाजाच्या बदलासाठी एक शक्तिशाली साधन ठरली पाहिजे. लेखनातून विचारांची क्रांती घडावी. जी सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे (Tarabai Shinde) यांच्या लेखनातून घडली. शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या (Ambedkar’s) विचारांची मशाल अधिक प्रज्वलित करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. जात, धर्म ,पंथ, पक्ष ,लिंग या पलीकडे जाऊन माणूस महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन आपण कायम परिवर्तनशील विचाराची (Variable Thinking) काय धरली पाहिजे. जगात माणसां पेक्षा माणुसकी पेक्षा काहीच मोठे असू शकत नाही. आपल्या धडावर आपलेच डोके व आपल्या डोक्यात आपलाच मेंदू असला पाहिजे.
साहित्य संमेलनाचे (Literary Conference) उद्घाटन राष्ट्रमाता जिजाऊ चित्रपटात जिजाऊ ची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री व विचारवंत प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांनी केले म्हणाल्या सृजन हा स्त्रियांचा स्थायीभाव आहे. साहित्याचे सामर्थ्य मोठे आहे शब्दांनी जग जिंकता येते. सर्व प्रश्नांचे मूळ अज्ञानात आहे. साहित्यातून ज्ञान प्राप्ती ही झाली पाहिजे स्त्रियांचे साहित्य आत्मकेंद्रित असू नये ते व्यापक असले पाहिजे. शोषकांचा अहमगंड व शोषितांचा (Exploited) न्युनगंड साहित्याने दूर केला पाहिजे. साहित्याने आत्मविश्वास निर्माण करावा. अन्यायाची जाणीव करून द्यावी. व तो निवाण्याचे बळ द्यावे. स्त्री पुरुष असा भेद किंवा स्त्री विरुद्ध पुरुष अशी भावना साहित्यातून व्यक्त केली जाऊ नये. समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. स्त्रीमुक्ती (Women’s Liberation) हा शब्द वापरण्याची गरज पडू नये. स्त्री किंवा पुरुष असा विचार न होता माणूस म्हणून त्यांचा विचार झाला पाहिजे. माणूसपणाच मानवतावादाचा (Humanism) राज्य साहित्याने निर्माण केले पाहिजे. संमेलनाच्या प्रमुख अतिथी आमदार सईताई डाहाके (MLA Saitai Dahake) यांनी स्त्री लेखिकांनी स्त्री जीवनाच्या वास्तव समस्या आपल्या लेखनातून मांडाव्यात असे आवाहन केले.
माननीय व्ही .बी. पाटील यांचा अमृत महोत्सव प्रीत्यर्थ यावेळी भावपूर्ण सत्कार करण्यात आला. त्यांनी सत्काराला समयोचित उत्तर दिले. यावेळी एल. एस. पी. एम. विद्यालयाच्या विद्यार्थिनी नृत्य सादर केले. याप्रसंगी संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य संजय हांडे यांनी प्रास्ताविक केले. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे महासचिव बालाजी जाधव उजेडकर व परिषदेचे अमरावती विभागीय अध्यक्ष प्रा. डॉ. गजानन घोंगटे यांचीही भाषणे यावेळी झाली. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रभा देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.विलास गांजरे यांनी केले.
उद्घाटनानंतर दुसऱ्या सत्रात ’21 व्या शतकातील स्त्रियांचे लेखन’ या विषयावर जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. सतीश तराळ यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात प्राध्यापक डॉक्टर पद्मिनी दुरुगकर घोसेकर यांनी 21 व्या शतकातील काव्य लेखन प्राध्यापक कीर्ती काळमेघ यांनी कादंबरी लेखन, धनश्री पाटील यांनी ललित लेखन तर प्राध्यापक सिमरेला देशमुख यांनी चरित्र, आत्मचरित्र व नाट्य लेखन या विषयावर आपले विचार मांडले.
परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश तराळ यांनी सर्व वक्त्यांच्या विचारांचा आढावा घेऊन 21 व्या शतकातील स्त्रियांचे कथालेखन याबाबतीत आपले विचार मांडले. ते म्हणाले 21 व्या शतकात स्त्रियांचे कथालेखन मंदावले आहे. 21 व्या शतकातील स्त्रियांच्या कथालेखनात आशयाची व्यापकता व व्या मिश्रता कमी आहे. बहुसंख्य कथालेखन मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय व महानगरीय आशायावर आधारित आहे.
माध्यम क्रांती, मल्टिपल रिलेशन, लिव्ह इन यासारखे विषय या कथांमध्ये धीटपणे व्यक्त होत असले तरी ग्रामीण, आदिवासी, उपेक्षित, भटक्या विमुक्त, स्त्री जीवनाचा आशय या कथेत अभावानेच आढळतो. अस्सल आणि कलात्मक आशय अभिव्यक्तीची ग्रामीण कथाही लिहिली गेली नाही. 21 व्या शतकातील स्त्रियांचे कथालेखन एकांगी स्वरूपाचे आहे. भोजनानंतरच्या तिसऱ्या सत्रात प्रा.डॉ. अनघा सोनखास्कर अकोला यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन संपन्न झाले. कथाकथनात प्राध्यापक डॉक्टर नेहा भटकर, प्राध्यापक मीना बोडखे अरुणा भोंडे यांनी आपल्या कथा सादर केल्या. विविध आशय आणि अभिव्यक्तीच्या या कथांनी कथाकथनात (Storytelling) चांगलीच रंगत आणली.
चौथ्या सत्रात प्राध्यापक डॉक्टर शोभा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्न झाले. यात धनश्री पाटील ,मीना बोडखे, रोशनी गतफणे, उमा गवई, मधुराणी बनसोड, वर्षा पतके थोटे, छाया पाथरे, संजीवनी काळे, निर्मलाताई पाटील, प्रभाताई पाटील, शारदा भुयार, शीला चिवरकर, अबोली गायकवाड इत्यादी कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या. पाचव्या समारोप सत्राच्या प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवयित्री प्राचार्य डॉक्टर शोभा रोकडे उपस्थित होत्या. त्यांनी लेखिका संमेलन अतिशय उत्कृष्ट व अविस्मरणीय झाले त्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. संमेलन अध्यक्ष डॉ लीना निकम यांच्या अध्यक्षीय मनोगताने संमेलनाचा समावेश झाला.





