‘कॅप्टन तुम्ही मी नौका, तुमच्या प्रेमाचा टेबल टाका…’ गाण्याने वेधले लक्ष; पुण्यातील कार्यक्रमात पोस्टर आणि टिझर प्रदर्शित, दीपाली सय्यद यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका
पुणे : राजकीय आणि सामाजिक विषयांवरील कथित वादग्रस्त संदर्भांमुळे चर्चेत आलेल्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी मराठी चित्रपटाभोवतीचे कुतूहल दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटाच्या नावामुळे आधीच चर्चेला उधाण आले असताना आता त्यातील भोंदूबाबाच्या व्यक्तिरेखेचा चेहरा समोर आला आहे. विशेष म्हणजे, या रहस्यमय भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चित्रपटातील नवे गाणे आणि भोंदूबाबाच्या लूकसह टिझर प्रदर्शित झाल्याने चित्रपटाच्या चर्चेला आणखी रंग चढला आहे.
पुण्यातील लेमन ट्री हॉटेलमध्ये आयोजित दिमाखदार कार्यक्रमात चित्रपटातील ‘कॅप्टन तुम्ही मी नौका, तुमच्या प्रेमाचा टेबल टाका…’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आले. याच कार्यक्रमात भोंदूबाबाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मनोज जोशी यांचा लूकही पहिल्यांदाच उघड करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चेहऱ्याबाबत निर्माण झालेली उत्सुकता यामुळे संपुष्टात आली आहे.
Maharashtra Epstein Files.. #Maharashtra_Epstein_Files https://t.co/beMYSObH8B
— リヴェン Riven (@R1v3n_0x) August 26, 2026
मनोज जोशींचा भोंदूबाबाच्या भूमिकेतील अनोखा अवतार
चित्रपटाच्या आधी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये भोंदूबाबाचा चेहरा दाखवण्यात आला नव्हता. केवळ पाठमोऱ्या आकृतीसह 'पडद्याआड लपलेला वादग्रस्त चेहरा उघड होतोय…!!! लवकरच…' असा संदेश देण्यात आला होता. त्यामुळे या भूमिकेत कोणता अभिनेता असेल, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अखेर या व्यक्तिरेखेसाठी मनोज जोशी यांची निवड झाल्याचे समोर आले आहे.
कार्यक्रमात त्यांनी याच खास गेटअपमध्ये उपस्थिती लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या व्यक्तिरेखेचा लूक इतर भूमिकांपेक्षा वेगळा असल्याचे पाहायला मिळाले. अभिनेत्री दीपाली सय्यद यादेखील चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, त्यांचा लूक यापूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता.
गाण्यातून राजकीय आणि सामाजिक संदर्भांवर भाष्य
चित्रपटातील नव्या गाण्याचे लेखन संजय नवगिरे यांनी केले असून, रोहित नागभिडे यांनी त्याला संगीत दिले आहे. मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजातील या गाण्याला उपरोधिक आणि मिश्कील शैलीची जोड देण्यात आली आहे.
'कॅप्टन' आणि 'नौका' या प्रतिमांचा आधार घेत नेतृत्व, संधीसाधूपणा आणि सत्तेच्या अवतीभोवती निर्माण होणाऱ्या संबंधांवर भाष्य करण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. गाण्याच्या शब्दांमधील सूचकता आणि संगीतामधील उपरोधिक बाज यामुळे हे गीत लक्षवेधी ठरत आहे.
साहिल साह यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले असून, तानिया चॅटर्जी यांनी त्यावर नृत्य सादर केले आहे. संगीत, शब्द आणि नृत्य यांचा मेळ साधत चित्रपटातील कथानकाचे काही संदर्भ गाण्याच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत.
भोंदूगिरीच्या प्रवृत्तीवर चित्रपटातून भाष्य
आनंदी पिक्चर्स अमरावती आणि सचिन रोडे पाटील प्रस्तुत ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाची निर्मिती मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्डच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन स्वरूप सावंत यांनी केले असून, समाजात वाढणाऱ्या भोंदूगिरीच्या प्रवृत्तीवर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. कथा, पटकथा आणि संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत, तर चित्रपटाची मूळ संकल्पना सागरकुमार एस. जैन यांची आहे.
दिग्गज कलाकारांची मांदियाळी
या चित्रपटात मनोज जोशी आणि दीपाली सय्यद यांच्यासह सुबोध भावे, उदय टिकेकर, अक्षय टंकसाळे, माधुरी पवार, सुरेश विश्वकर्मा, भारत गणेशपुरे, अनिल नगरकर, मोनिका, शिवराज वालवेकर, सिद्धेश्वर झाडबुक्के, श्रेया कुलकर्णी आणि राहुल बेलापूरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
चित्रपटाच्या तांत्रिक बाजूची जबाबदारीही अनुभवी टीमने सांभाळली आहे. आकाश काकडे यांनी छायाचित्रण केले असून, अक्षय आंबेकर यांनी कलादिग्दर्शनाची धुरा पेलली आहे. अपेक्षा गांधी सोनी यांनी वेशभूषेचे काम पाहिले आहे.
निर्मिती व्यवस्थापनामध्ये नेहा घोडके यांनी प्रॉडक्शन कंट्रोलर, तर सचिन घनवट यांनी प्रॉडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे. यश सणस हे लाईन प्रोड्युसर असून, विजय म्हस्के यांनी प्रॉडक्शन मॅनेजरची जबाबदारी सांभाळली आहे.
नाव, रहस्यमय पोस्टर, भोंदूबाबाची व्यक्तिरेखा आणि नव्या गाण्यामुळे ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटातून कोणते सामाजिक आणि राजकीय संदर्भ मांडले जाणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.