मराठी चित्रपट गोंधळ ऑस्कर

मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची ऑस्करमध्ये एंट्री; सिनेमाच्या शिरपेचात मानाचा तुरा

Marathi film Gondhal Oscars: मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची 2027 च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका निवड

मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची ऑस्करमध्ये एंट्री; सिनेमाच्या शिरपेचात मानाचा तुरा

Marathi film Gondhal Oscars

 

महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा आणि मनोवैज्ञानिक थराराचा अनोखा संगम

नवी दिल्ली/ मुंबई (Gondhal Oscar 2027) : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची 2027 च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (FFI) शुक्रवारी ही घोषणा केली. 99व्या अकादमी पुरस्कारांमध्ये ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ श्रेणीत हा चित्रपट भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित ‘गोंधळ’ हा थरारपट पारंपरिक गोंधळ विधी, लोकपरंपरा, मानवी नातेसंबंध आणि मानसिक संघर्ष यांची सांगड घालतो. (Marathi film Gondhal Oscars) चित्रपटाची कथा एका रात्रीदरम्यान घडणाऱ्या घटनांभोवती उलगडत जाते. पारंपरिक लोककलेच्या वातावरणातून मानवी भावभावना, इच्छा, तणाव आणि संघर्ष यांना थरारक पद्धतीने मांडण्यात आले आहे.

काय आहे ‘गोंधळ’ची कथा?

चित्रपटाची कथा (Marathi film Gondhal Oscars) ग्रामीण महाराष्ट्रात घडते. सुमन या तरुणीच्या आयुष्यातील नातेसंबंध आणि तिच्या भावविश्वाभोवती कथानक फिरते. विवाह, जुन्या नात्यांच्या सावल्या आणि गावातील सामाजिक-सांस्कृतिक वातावरण यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची होत जाते. पारंपरिक गोंधळ विधीच्या पार्श्वभूमीवर कथानक पुढे सरकत असताना मानवी इच्छा, असुरक्षितता, फसवणूक आणि मानसिक संघर्ष यांचे विविध पदर उलगडत जातात. त्यामुळे हा केवळ लोकपरंपरेवर आधारित चित्रपट न राहता मानवी मनाचा वेध घेणारा थरारपट ठरतो.

33 चित्रपटांमधून निवड

ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका निवडण्यासाठी यंदा एकूण 33 चित्रपट शर्यतीत होते. त्यापैकी 14 हिंदी, चार मराठी, चार तेलुगू, चार गुजराती, तीन तमिळ, तसेच मल्याळम आणि नागामी भाषेतील चित्रपटांचा समावेश होता. विशेष ज्युरीने सर्व चित्रपटांचा विचार केल्यानंतर ‘गोंधळ’ची निवड केली.

संतोष डावखर यांना ‘सिल्व्हर पीकॉक’

‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर यांना यापूर्वीच आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव मिळाला आहे. 2025 मध्ये झालेल्या ५६व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये त्यांना ‘गोंधळ’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सिल्व्हर पीकॉक पुरस्कार मिळाला होता.

चौथ्या मराठी चित्रपटाची ऑस्करवारी

‘गोंधळ’ हा ऑस्करसाठी (Marathi film Gondhal Oscars) भारताची अधिकृत प्रवेशिका ठरणारा चौथा मराठी चित्रपट ठरला आहे. यापूर्वी ‘श्वास’ (2005), ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (2009) आणि ‘कोर्ट’ (2015) या मराठी चित्रपटांची भारताकडून ऑस्करसाठी निवड झाली होती. ‘गोंधळ’ची निवड झाल्यामुळे महाराष्ट्राच्या लोकपरंपरा आणि प्रादेशिक कथानकाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे. आता चित्रपटाचा पुढील प्रवास ऑस्करच्या निवड प्रक्रियेत कसा होतो, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे. 99वे अकादमी पुरस्कार 14 मार्च 2027 रोजी होणार आहेत.