रुग्णालयातील फोटो शेअर करत म्हणाले, ‘एका खंबीर माणसाला कोणीही हरवू शकत नाही’; चाहत्यांकडून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव
मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पाठीच्या कण्याशी संबंधित समस्येमुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ही प्रक्रिया तब्बल सहा तास चालली. उपचारानंतर अभिनेत्याने स्वतः सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत चाहत्यांना आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे.
शरत सक्सेना यांनी दोन पोस्टच्या माध्यमातून हेल्थ अपडेट दिले. त्यापैकी एका पोस्टमध्ये शस्त्रक्रियेपूर्वी ते उभे राहून एमआरआय तपासणी करताना दिसत आहेत. दुसऱ्या पोस्टमध्ये शस्त्रक्रियेनंतरची त्यांची अवस्था पाहायला मिळते. उपचारानंतर ते उत्साही आणि सकारात्मक दिसत असून, रुग्णालयातून घरी परततानाचे फोटोही त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
सहा तासांच्या स्पाइन सर्जरीनंतर त्यांनी पोस्टसोबत, “६ तासांची स्पाइन सर्जरी पूर्ण झाली. एका खंबीर माणसाला कोणीही हरवू शकत नाही,” असा संदेश दिला. त्यांच्या पोस्टमध्ये रुग्णालयातील उपचारादरम्यानचे तसेच घरी परततानाचे अनेक क्षण आहेत. एका छायाचित्रात ते अंथरुणावर विश्रांती घेताना कुटुंबीय आणि मित्रांसोबत हसताना दिसतात, तर दुसऱ्या छायाचित्रात जवळच्या व्यक्तींसोबत कारमधून घरी जाताना ते दिसत आहेत.
शस्त्रक्रियेनंतरच्या पोस्टमध्ये शरत सक्सेना यांनी नेहमीच्या विनोदी अंदाजात आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली. एका छोट्या सेलिब्रेशनच्या छायाचित्रावर त्यांनी ‘आज पार्टी, उद्या जिम’ असा मजेशीर संदेश लिहिला. रुग्णालयातील खोलीतील एका फोटोवर ‘आता आणखी सूप नको!’ तर दुसऱ्या छायाचित्रावर ‘आता चालण्याची काठी नको!’ असा संदेश देण्यात आला आहे. या पोस्टमधून उपचारानंतर ते चांगले असल्याचे दिसून येते.
अभिनेत्याच्या हेल्थ अपडेटनंतर चाहते तसेच चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत लवकर पूर्णपणे बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
शरत सक्सेना यांची कारकीर्द पाच दशकांहून अधिक काळाची आहे. या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी हिंदीसह विविध प्रादेशिक भाषांमधील २५० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘मिस्टर इंडिया’, ‘त्रिदेव’, ‘घायल’, ‘खिलाडी’, ‘गुलाम’, ‘गुप्त: द हिडन ट्रुथ’, ‘फिर हेरा फेरी’, ‘बागबान’, ‘फना’, ‘सन ऑफ सरदार २’, ‘क्रिश’ आणि ‘बजरंगी भाईजान’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत.
विशेषतः खलनायकाच्या भूमिकांमधून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. दमदार अभिनय आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे शरत सक्सेना यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ आपली छाप कायम ठेवली आहे.