गडचिरोली पोलीस दल आणि सहयोग हॉस्पिटल, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविली जाणार योजना
गडचिरोली (Health Welfare Yojana) : जिल्ह्रामध्ये नक्षल्यांच्या हिंसक कारवायांमध्ये सुरक्षा दलाचे आजपावेतो एकूण २१३ जवान शहीद झालेले आहेत. सर्व शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या कल्याणाकरिता गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात. याचाच एक भाग म्हणून शहीद कुटुंबाबद्दल कृतज्ञता तसेच आदर व्यक्त करण्याच्या दृष्टीकोनातून (Health Welfare Yojana) शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता गडचिरोली पोलीस दल व सहयोग हॉस्पिटल, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ३० मे २०२५ रोजी पासून ‘शहीद सैनिक आश्रित कुटुंब आरोग्य कल्याण योजनेचा’ लाभ सुरु करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना गडचिरोली जिल्ह्रात राबविली जाणार आहे. सहयोग हॉस्पिटल, गोंदियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जयेशचंद्र रमण रमादे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या शहीद सैनिक आश्रित कुटुंब आरोग्य कल्याण योजनेच्या (Health Welfare Yojana) माध्यमातून गडचिरोली पोलीस दलातील शहीद जवानांच्या कुटुंबातील आई-वडील, पत्नी व १८ वर्ष वयाखालील पाल्य यांच्याकरिता आपत्कालीन सुविधा, ओपीडी, आयपीडी, शस्त्रक्रिया तसेच रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सर्व वैद्यकिय सुविधांचा लाभ पूर्णपणे मोफत पुरविला जाणार आहेत.
सदर योजनेच्या माध्यमातून शहीद जवानांच्या कुटुंबियांना विविध अत्यावश्यक तसेच अत्याधूनिक वैद्यकिय सुविधांचा लाभ मिळणार आहे. रुग्णालयातील कार्डीओलॉजी, न्युरोलॉजी, पॅथॉलॉजी, रेडीओलॉजी यासारख्या विविध अत्याधूनिक विभागांद्वारे शहीद जवानांच्या कुटुंबातील अबालवृद्धांना प्राथमिक वैद्यकिय चाचणीपासून ते अत्याधूनिक शस्त्रक्रियेपर्यंतच्या सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली व सहयोग हॉस्पिटल, गोंदिया यांच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने जिल्हाभरातील (Health Welfare Yojana) शहीदांच्या कुटुंबियांसाठी सदर योजना कार्यान्वित केली जाणार आहे. या प्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांना सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.