सोमवारी व्याख्यान कार्यक्रम उत्साहात संपन्न!
मानोरा (Swachhata Hi Seva Abhiyan) : स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील कला, विज्ञान व कै. पांडुरंगजी ठाकरे वाणिज्य महाविद्यालयात दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी “स्वच्छता ही सेवा” (Swachhata Hi Seva Abhiyan) अभियान 2025 या पंधरवाडा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानामध्ये भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा व शिक्षण क्षेत्रातील मोलाच्या योगदानाचा आढावा घेण्यात आला.
डॉ. ए. वाय. अली (विभागप्रमुख, इंग्रजी) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राधाकृष्णन यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे शिक्षक म्हणून असलेले स्थान, तसेच त्यांचे आदर्शमूल्ये यांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यांनी सांगितले की, डॉ. राधाकृष्णन यांनी शिक्षणाला दिलेली नवी दिशा आजच्या पिढीने आत्मसात करून समाजउभारणीसाठी कार्य करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी शिक्षक-विद्यार्थी नाते अधिक दृढ व्हावे, शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांनी आदरभाव कायम ठेवावा यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रसंगी एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. किशोर कोपरकर तसेच महिला कार्यक्रम अधिकारी सौ. स्नेहल ढवळे यांनी यशस्वीरित्या कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच याच दिवशी महाविद्यालयात “आवडीचा प्राध्यापक” हा विशेष उपक्रमही पार पडला.
या (Swachhata Hi Seva Abhiyan) उपक्रमात विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या प्राध्यापकांविषयी पाच ओळी लिहून त्या बंद डब्यात जमा करण्यास सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी मनापासून या उपक्रमात सहभाग घेतला. या माध्यमातून शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील परस्पर स्नेह व आदर वृद्धिंगत होऊन महाविद्यालयात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी व एनएसएस स्वयंसेवक यांनी उत्साहाने योगदान दिले. “स्वच्छता ही सेवा 2025” अभियानाच्या माध्यमातून ज्ञान, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी या तिन्ही मूल्यांचा संगम घडून आला.