महायुतीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर
नाशिक(Nashik):- येथील लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha constituencies) महायुतीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी आज दुपारी जाहीर करण्यात आली. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) की हेमंत गोडसे हा वाद आता पूर्णपणे संपला आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे गटाने हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली. परंतु, त्यासाठी गोडसेंना प्रचंड परिश्रम करावे लागले. त्यांच्या विरोधातील उमेदवार ठाकरे गटाचे राजेभाऊ वाजे यांचे प्रचाराची एक फेरी पूर्ण होईपर्यंत ही उमेदवारी जाहीर करण्यात भाजपने(BJP) व्यत्यय आणला होता.
सलग दोन वेळा लोकसभेत विक्रमी मतांनी विजय
विशेष म्हणजे नाशिकमध्ये लागोपाठ कोणीही खासदार निवडून येत नाही. परंतु हेमंत गोडसेंनी तो विक्रम मोडीत काढून सलग दोन वेळा लोकसभेत विक्रमी मतांनी विजय मिळविला होता. परंतु यंदाच्या राजकीय गदारोळात तिकीट मिळवण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. विशेष म्हणजे हा संघर्ष पक्षांतर्गत नव्हता; तर तो भाजपाच्या विरोधातला होता. हा मतदारसंघ शिवसेनेतून खेचून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु मुख्यमंत्री पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकची जागा गोडसे यांच्यासाठी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे इतके दिवस नाशिक लोकसभा कोण लढविणार? याचे चित्रच स्पष्ट होत नव्हते. उमेदवारच नव्हे तर महायुतीचा नाशिकचा उमेदवार कोण असेल, याचे उत्तरच मिळत नव्हते. त्यामुळे लोकांमध्ये महायुतीचे हसे झाले होते.
अन् महाराजांसह भाजपचा देखील हिरमोड झाला
त्यातच भारतीय जनता पक्षाने ज्यांचा उल्लेख सातत्याने ‘संकटमोचक’ असा केला होता, त्या गिरीश महाजन यांनी नाशिक मध्ये लुडबुड सुरू केल्याने शिवसेनेच्या शिंदे गटात नाराजी पसरली होती. लोकसभेसाठी शांतिगिरी महाराज देखील इच्छुक होते. नुकतेच त्यांनी शक्तिप्रदर्शन देखील केले होते. पण आज शेवटी शिंदे गटाकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली अन् महाराजांसह भाजपचा देखील हिरमोड झाला. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या मतदारसंघांची (Constituencies of Nashik) चर्चा राज्यभर सुरू होती. त्याला आता पूर्णविराम मिळाला असला, तरी राज्यातील ४८ जागांपैकी सर्वात शेवटची जागा नाशिकची जाहीर करण्यात आल्यामुळे मतदारांसमोर संभ्रम पसरला आहे. अर्थात उमेदवारी जाहीर होतात संपूर्ण मतदारसंघात आपला एक फेरी पूर्ण झाली असल्याचा दावा खा. गोडसे यांनी नुकताच केला. आता ठाकरे गटाचे वाजे व शिंदे गटाचे गोडसे यांच्यातील रंजक सामना पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.