Gadchiroli :- जहाल नक्षली डिव्हीसीएम भिमन्ना ऊर्फ व्यंकटेश ऊर्फ सुखलाल मुत्तय्या कुळमेथे आणि त्याची पत्नी डिव्हीसीएम विमलक्का सडमेक हिचेसह एक कमांडर, दोन पीपीसीएम व एक एसीएम पदावरील एकूण ०६ नक्षल्यांनी पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्या समोर आज २४ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे आत्मसमर्पण केले. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे एकुण ६२ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. गडचिरोली पोलीस (Gadchiroli Police) व सिआरपीएफ (CRPF)यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण ४० नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
सर्व नक्षली मिळुन ६२ लाख रूपयांचे होते बक्षिस
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्यासह अप्पर पोलीस महासंचालक डॉ. छेरिंग दोरजे यांचा गडचिरोली जिल्हा दौरा आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी पार पडला. पोलीस महासंचालकासमोर आत्मसमर्पण करणार्या नक्षल्यामध्ये भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे (डिव्हीसीएम, उत्तर बस्तर डिव्हीजन मास टिम)(५८ ) रा. करंचा ता. अहेरा, विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक, (डिव्हीसीएम, माड डिव्हीजन, डीके प्रेस टिम इंचार्ज), ( ५६), रा. मांड्रा, ता. अहेरी, कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी, (कमांडर, पश्चिम ब्युरो टेलर टिम), ( ३४), रा. पडतानपल्ली, ता. भामरागड, नागेश ऊर्फ आयताल गुड्डी मडावी (पीपीसीएम, कंपनी क्र. १०), (३९) रा. पामरा, ता. भैरामगड, जि. बीजापूर (छ.ग.), समीर आयतू पोटाम, (पिपीसीएम, दक्षिण ब्युरो टेक्नीकल टिम), (२४) रा. पुसणार, ता. गंगालूर, जि. बीजापूर (छ.ग.) आणि नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी, (एसीएम, अहेरी दलम), ( २८ ) रा. नैनेर, ता. अहेरी, जि. गडचिरोली यांचा समावेश आहे.