Gadchiroli :- पुतण्याला ५ कोटी रुपये देऊन निवडणुकीत पराभव करण्याचे षडयंत्र रचाल्याचा आ. धर्मरावबाबा आत्राम यांचा भाजपावरील आरोप हा भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्लॅनिंगचा एक भाग असून धर्मनिरपेक्षतेचा आव आणून भाजपाच्या ट्रेजडीनुसार अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आ.विजय वडेट्टीवार यांनी केला. गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महायुती शासनाने शेतकर्यांचे वाटोळे केले आहे
आ. धर्मराव बाबा आत्राम म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) जिल्ह्यात क्रमांक एक वर आहे. तर भाजपा म्हणते आम्ही नंबर एक वर आहोत. ही सर्व मंडळी सूरजागड च्या भरवशावर बोलत आहेत. काँग्रेस (congress) पक्ष हाच जिल्ह्यात सध्या क्रमांक एक वर असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी बाबत आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले असल्याचेही आ.वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. महायुती शासनाने शेतकर्यांचे वाटोळे केले आहे. शासन शेतमालाला हमी भाव देत नाही. २०१४ मध्ये धानाला जेवढे भाव होते तेवढेच आता २०२५ मध्ये आहेत.सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्यांची देखील तीच अवस्था आहे. या ११ वर्षाच्या काळात खत, कीटकनाशके , डिझेल व शेतीच्या मशागतीचे तिप्पट भाव वाढले आहेत. महागाईने उच्चांक केला.
त्यामुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप महायुती शासनाने केल्याचा आरोप यावेळी आ. वडेट्टीवार यांनी केला. यावेळी पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, अॅड. राम मेश्राम, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अॅड. कविता मोहोरकर, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अॅड.विश्वजित कोवासे, प्रभाकर वासेकर, सतीश विधाते आदी उपस्थित होते.