शिक्षक सुधाकर संग्रामे यांनी मांडलेली खंत
सेंदूरवाफा (Small Village School) : नव्या संच मान्यतेत बर्याच जिल्ह्यात अनेक शाळा शून्य शिक्षकी दाखवण्यात आल्या आहेत. तर अनेक शाळांची शिक्षक संख्या निम्म्याने कमी झालीय. ज्याची भिती होती तेच घडलंय. खरतर ह्या शाळांच्या मृत्यूघंटा गेली दोन ते तीन वर्षे वाजत होत्या. नवीन संचमान्यतेत त्यावर शिक्कामोर्तब झाले एवढेच. धनदांडग्यांच्या (शिक्षण महर्षी) शाळा व शहरातल्या श्रीमंत शाळा आता सुरळीत चालतील. खेड्यापाड्यातल्या शाळा बंद पडतील अशी खंत भंडारा जिल्ह्यातील (Small Village School) जि.प.शाळेतील शिक्षक सुधाकर संग्रामे यांनी मांडली.
ही खंत पुढे त्यांनी या शब्दांमध्ये मांडली की नव्या संचमान्यतेच्या जाचक अटींमुळे जि.प.शाळांमधील ती किलबिल, ते फळे…ते खडू नि:शब्द होतील. भिंती उदास होतील. कालांतराने छप्परे व भिंती कोसळतील. रान वाढेल. कधीतरी कुणी सासूरवाशीण तिथून जाताना आपल्या मुलांना सांगेल…इथे माझी शाळा होती…ही (Small Village School) शाळा होती म्हणूनच मी शिकू शकले… अन् आता तुम्हाला शिकण्याची प्रेरणा देतेय. काटे- कुठे तुडवत….डोंगर.. नद्या…पार करत खेड्यातली मुलं शाळेत येत होती. शाळा बंद पडल्यावर ही मुलं कुठे जातील? ना गाड्यांची सोय, ना पैशांच पाठबळ. त्यामुळे शहरात जाणे शक्यच होणार नाही. एकवेळ मुलगे कसेबसे शाळा गाठतील पण मुलींचं काय? सावित्रीच्या लेकी पुन्हा अर्धवट शिक्षित किंवा अशिक्षित राहतील.
नवे शैक्षणिक धोरण…. पहिलीपासून हिंदी ह्या सगळ्या दूरच्या गोष्टी झाल्या. मुळातच अपुरे शिक्षक… अपुर्या सुविधा यामुळे सध्या शिक्षणाचा स्तर भयानक पातळीवर आहे. पण हे सगळं दडवून ठेवलंय किंवा खोटा देखावा उभा केला जातोय. सरकारी तिजोरी रिकामी झालीय त्याचा फटका गावातल्या शाळांना व तिथल्या मुलांना बसतोय.
गावातल्या शाळा संस्था चालकांनी…गावकर्यांनी…. अपुर्या शिक्षकांनी….माजी विद्यार्थ्यांनी……शर्थीचे प्रयत्न करून आजपर्यंत जगवल्या होत्या. पण आता त्यांचे हे प्रयत्न मातीमोल ठरलेत… इतिहास जमा झालेत. नव्या महाराष्ट्राच्या खेड्यातला विद्यार्थी आता शिक्षण सोडून… मोलमजुरीला जाईल. संध्याकाळी थकलेला…हरलेला…..असा विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जाईल. राष्ट्राचा हा आधार कणाहीन होईल.
एका विद्यार्थ्यासाठी (Small Village School) शाळा चालवणार जपानसारखं राष्ट्र प्रगत व राष्ट्रप्रेमाने का भारलेलं आहे? त्याच उत्तर हे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत आहे. शेवटच्या घटका मोजत असलेल्या सर्व शाळांना आधीच दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रध्दांजली देण्याव्यतिरिक्त आपण काहीच करू शकत नाही हेच खरं. त्यासाठी सर्व गोरगरीब, मोलमजुरी, शेतकरी बांधवांनी सावध होणे अत्यंत गरजेचे आहे. अशा शब्दांमध्ये ही खंत लाखांदूर तालुक्यातील दहेगाव येथील शाळेतील शिक्षक सुधाकर एच.संग्रामे यांनी मांडली आहे.