हिंगोली (Hingoli Zilha Parishad) : हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत सामान्य प्रशासन विभागात ६० कर्मचार्यांना दसर्याच्या मुहुर्तावर पदोन्नतीचे सोने मिळाले असून मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या पदोन्नत्यांचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी काढले आहेत. पारदर्शकपणे झालेल्या या पदोन्नतीमुळे कर्मचार्यांनी दसरा सणाला पदोन्नतीचे सोने लुटल्याचे मानले जात आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये (Hingoli Zilha Parishad) मागील काही दिवसांपासून पात्र कर्मचार्यांना पदोन्नतीची भेट देण्यात आली. पंचायत विभाग, आरोग्य विभागातील कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर सर्वात मोठा विभाग असलेल्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत कार्यरत कर्मचार्यांना पदोन्नती मिळण्याची प्रतिक्षा होती. त्यानुसार या कर्मचार्यांनाही पदोन्नती देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रभारी उपमुख्यकार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांनी पात्र कर्मचार्यांची माहिती तयार करून सर्व प्रस्ताव अद्यायावत केले होते. त्यानंतर कर्मचार्यांच्या बारकाईने आढावा घेत पदोन्नतीचा निर्णय घेतला गेला विशेष म्हणजे संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक ठेवण्यात आली. कोणत्याही कर्मचार्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली.
दरम्यान, जिल्हा परिषद (Hingoli Zilha Parishad) अंतर्गत पात्र कर्मचार्यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक यापदावर पदोन्नती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे वर्ग चार संवर्गातील २५ पेक्षा अधिक कर्मचार्यांना वर्ग तीन मध्ये पदोन्नती मिळाली आहे. या पदोन्नतीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी काढले आहेत.
जि.प. कर्मचारी युनियन तर्फे अभिनंदन
कर्मचार्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न जि.प. कर्मचारी युनियन हिंगोली तर्फे लावून धरला होता. त्यानुसार पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढला. ज्यामध्ये कनिष्ठ प्रशासन अधिकारी १०, सहाय्यक प्रशासन अधिकारी ५, वरिष्ठ सहाय्यक १३, कनिष्ठ सहाय्यक ३२ आणि कनिष्ठ सहाय्यक लेखा ३ अशा एकुण ६० जणांची पदोन्नती झाल्याने महाराष्ट्र राज्य जि.प. कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांनी (Hingoli Zilha Parishad) जि.प. प्रशासनाचे अभिनंदन केले.