Gadchiroli :- महसूल विभागातील (Revenue Division) अधिकार्यांनी कोणत्याही गैरप्रकाराला थारा न देता लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान’ कार्यपद्धतीने कार्य करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे व जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी आज १९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल प्रशासकीय कामकाज, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग व भूमी अभिलेख विभागाचा आढावा आढावा घेतला.
आढावा बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, खा. डॉ. नामदेव किरसान, आ. डॉ. मिलिंद नरोटे, आ. रामदास मसराम, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत ‘सेवा पंधरवाडा’ अभियान, नवीन रेती धोरण, महसूल वसुली आणि भूसंपादन आदि विषयांचा सखोल आढावा घेण्यात आला. महसूल विभागाचे मूळ काम सातबाराच्या नोंदी अद्ययावत ठेवायच्या आहेत. त्यामुळे, पुढील तीन महिन्यांत ‘जीवंत सातबारा’ च्या नोंदी १०० टक्के अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच प्रत्येक तालुक्यातील घरे आणि जमिनींचे मॅपिंग करून शासकीय, वन आणि झुडपी जंगल जमिनींचे वर्गीकरण करण्याची सूचना केली.
बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुद्रांक जिल्हाधिकारी अंकिता तांदळे व भूमि अभिलेख अधिक्षक विजय भालेराव यांनी सादरीकरणाद्वारे विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. बैठकीला नोंदणी उपमहानिरीक्षक साहेबराव दुतोंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे व संजय आसवले, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.