जमीन काढली विक्रीला; लोकांचं लई देणंपाणी झालंय, सरकारनं कर्ज माफ करावं!
लातूर (Old farmer cattle) : लोकांचं लई देणंपाणी झालंय… पहिलं पेरलं, बियाणंच वापलं नाही. दुसऱ्यांदा पेरलं, उगवून आलं, पण तीस दिवसापासून पाऊस नाही… पिक वाळून चाललंय… खिशात पैसा नाही… देणेकरी बसू देईनात… म्हणून नाईलाजानं शेत विकायला काढावं लागलं… असं म्हणत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या नागरसोगा येथील वयोवृद्ध शेतकऱ्याने (Old farmer cattle) एका बैलासोबत आपला खांदा देत शेतात कोळपणी चालविली आहे. सरकारनं कर्जमुक्ती द्यावी, एवढीच या शेतकऱ्याची माफक अपेक्षा आहे.
कालच राज्याच्या विधानसभेत लातूरच्या पूर्व भागातील अवैध सावकारीचा पर्दाफाश माजी मंत्री अमित देशमुख यांनी केला असतानाच दुसऱ्याच दिवशी औसा तालुक्यात कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या गेलेल्या शेतकऱ्याची आर्त हाक राज्याच्या पटलावर उमटली आहे.
औसा तालुक्यातील नागरसोगा येथील 70 वर्षीय शेतकरी गोरोबा अडसुळे यांची ही कहाणी आहे. (Old farmer cattle) औसा शहरापासून केवळ चार-पाच किलोमीटर अंतरावरील हे गाव. अडसुळे यांना चार एकर जमीन. मात्र या जमिनीत केलेला पेरा बियाणे बोगस निघाल्याने वाया गेला. पेरलेले बियाणे उगवलेच नाही. अखेर पुन्हा एकदा पेरणी करावी लागली. दुबार पेरलेले कसेबसे उगवले. परिस्थितीमुळे लोकांचं काही देणं देता येत नव्हतं. म्हणून जोडीला एक बैल विकून लोकांचं काही देणं दिलं. त्यामुळे एकच बैल राहिला. शेतीत कोळपणी करण्यासाठी त्या बैलाच्या खांद्यावर जू देत दुसऱ्या बाजूला आपला खांदा देणारा हा वृद्ध शेतकरी कर्जामुळे मेटाकुटीस आला आहे. एका बँकेचे कर्ज आहे, त्याची परतफेड करायची. अनेकांकडून हात उसने घेतलेले देणे आहे. त्या देणेकर्यांना किती दिवस थांबणार? एक ना एक दिवस त्यांना पैसे द्यावेच लागणार आहेत. (Old farmer cattle) शेती विकणार नव्हतो, पण देणं असल्यामुळे नाईलाज आहे. म्हणून शेती विकायला काढली, अशी करून कहानी या वृद्ध शेतकऱ्याने माध्यमांसमोर मांडली.
पाच एकर जमिनीपैकी एक एकर जमीन तळ्यात मात्र सरकारकडून त्याचा मावेजा अद्यापही मिळाला नाही. सरकारकडून येणं अन लोकांचा देणं, याच्यामध्ये गोरोबा अडसुळे हे अडकित्तामध्ये सापडलेल्या सुपारी सारखे सापडले आहेत. हे हेरूनच काहींनी जमीन विकायला काढण्याचा सल्ला, दिल्याची चर्चाही आता रंगली आहे. गेल्या काही वर्षात तालुक्यात शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचे काम केले जात आहे. याच्या मुळाशी गेल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांची गळचेपी उघड होणार आहे.
मुळशी पॅटर्न सारखी परिस्थिती…
लातूर जिल्ह्यात कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबला गेला आहे. त्याला कर्जमुक्त करणे आवश्यक आहे. सरकारने दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन पाळणे आवश्यक आहे. मुळशी पॅटर्न सारखी तालुक्यात परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या वेदना ऐकाव्यात एवढीच माफक अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांनी ‘देशोन्नती’शी बोलताना दिली.