कारंजा (Washim):- कर्जबाजारीस कंटाळून एका 65 वर्षीय वृद्धाने विहिरीत(wells) उडी घेऊन आत्महत्या (suicide) केली. ही घटना कारंजा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील किन्ही रोकडे येथे 17 ऑगस्टला पहाटे उघडकीस आली. नारायण गुलाबराव रोकडे वय 65 वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचे नाव असून, ते किन्ही रोकडे येथील रहिवासी होते.
ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला
सुत्रांच्या माहितीनुसार,शनिवारी 17 ऑगस्ट रोजी सकाळी गावाजवळील सरकारी विहिरीच्या काठावर बिडी बंडल आणि माचिस दिसून आली. त्यामुळे ग्रामस्थांना विहिरीत कोणीतरी पडल्याचा संशय आल्याने प्रारंभी ग्रामस्थांनी विहिरीत शोधले. परंतु पाणी अधिक असल्याने थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर पिंजर येथील संत गाडगेबाबा बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आणि जीवरक्षक दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या चमुने ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला
त्यानंतर कुटुंबीयांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली .त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणला. या संदर्भात संजय रोकडे यांच्या दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, पुढील तपास ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर उगले, शिवाजी ठवकर व शामल ठाकूर करीत आहेत. दरम्यान, मृतकाच्या नावे चार एकर एवढी शेती असून त्यावर कर्ज असल्याने कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.




