१२०० भरले, मिळाले फक्त ८४
सिहोरा परिसरात शेतकर्याची थट्टा!
सिहोरा परिसरात शेतकर्याची थट्टा!
‘आमदनी आठ्ठन्नी, खर्चा बाराणा’ म्हणायची वेळ!
राहुल भवसागर
हरदोली/सिहोरा (Pik Vima Company) : सण-उत्सवाच्या काळात शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम पीक विमा कंपनीने केले आहे. सिहोरा परिसरातील एका शेतकर्याने पिकाच्या नुकसानीपोटी १२०० हप्ता भरला असताना, त्याला भरपाई म्हणून केवळ ८४ रुपये इतकी तुटपुंजी रक्कम मिळाली आहे. ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’च्या नावाखाली विमा कंपन्या शेतकर्यांची अक्षरशः चेष्टा करत असून, यामुळे ‘आमदनी आठ्ठन्नी, खर्चा बाराणा’ अशी परिस्थिती शेतकर्यांवर ओढवल्याचे चित्र आहे.
विमा योजनेच्या नावाखाली शेतकर्याची चेष्टा
सिहोरा परिसरातील शेतकरी गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि रोगराईमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे संकटात सापडला होता. कर्ज काढून आणि पदरमोड करून त्याने आपल्या पिकांचे विमा संरक्षण केले होते. त्यासाठी त्याने सुमारे ?१२०० इतका हप्ता भरला होता. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्यावर, नियमानुसार त्याने वेळेत विमा कंपनीकडे नुकसानीचा दावा दाखल केला. कंपनीच्या प्रतिनिधींनी पंचनामेही केले.
मात्र, दिवाळीच्या तोंडावर शेतकर्याच्या बँक खात्यात विमा भरपाईची रक्कम जमा झाली, ती पाहून त्याला मोठा धक्का बसला. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या भरपाईची रक्कम होती फक्त ८४ रुपये ज्या नुकसानीपोटी हजारो रुपयांची अपेक्षा होती, त्यासाठी केवळ ८४ रुपये मिळाल्याने विमा कंपनीने आपल्या नुकसानीची थट्टा केल्याची भावना या शेतकर्याने व्यक्त केली.
चिल्लर भरपाईने शेतकर्यांचा संताप
एकीकडे शेतीत झालेला मोठा तोटा, दुसरीकडे दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर असताना, विमा कंपनीने दिलेली ही ‘चिल्लर’ भरपाई म्हणजे क्रूर थट्टाच आहे. सिहोरा परिसरात अनेक शेतकर्यांची हीच व्यथा आहे. अनेकांना १९, ४०, १००,२०० अशा नगण्य रकमा मिळाल्या आहेत. शेतकर्याचा पिकांवरील एकरी खर्च १० ते १५ हजार रुपयांच्या घरात जातो. १२०० हप्ता भरून ८४ भरपाई मिळणे, याचा अर्थ शेतकरी हितासाठी असलेली योजना पूर्णपणे कंपन्यांच्या फायद्याची ठरत आहे.
शेतकरी नेत्यांची तीव्र प्रतिक्रिया
या संदर्भात शेतकरी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘शेतकर्यांच्या घामावर विमा कंपन्यांनी डल्ला मारला आहे. ही तुटपुंजी रक्कम म्हणजे शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. सरकारने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन, विमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालावा आणि सर्व्हेक्षण व पंचनाम्याच्या निकषांची फेरतपासणी करून पात्र शेतकर्यांना योग्य भरपाई द्यावी,’ अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.
दिवाळी झाली अंधारात:
पीक विमा योजनेवर विश्वास ठेवून अनेक शेतकर्यांनी भविष्यातील संकटांसाठी तयारी केली होती. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर विमा कंपनीने दाखवलेल्या ‘महाप्रतापा’मुळे शेतकर्यांची दिवाळी अंधारात जाण्याची वेळ आली आहे. सरकार आणि प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन सिहोरा परिसरातील शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे