वर्धा (Wardha) :- नादुरूस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागील बाजूने आलेल्या वाहनाने जबर धडक दिली. त्यात एक जणाचा जागीच मृत्यू झाला. वाहनचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात ५ मे रोजी रात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावर मुंबई (Mumbai) कॉरिडोर विरूळ पेट्रोल पंप शिवारात घडला.
समृद्धी महामार्गावर अपघात, क्रेनच्या सहाय्याने काढले दोघांना बाहेर
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक – एमएच ४१ एटी ८३३७ चा चालक गणेश शिवाजी कोरडे रा. दहिगाव जिल्हा नाशिक याने क्लच प्लेट काम करत नसल्याने ट्रक बाजूला उभा केला. यावेळी मागून येणार्या वाडी नागपूर येथून अहिल्यानगर येथे पुस्तक घेऊन समृद्ध महामार्गाने जात असलेल्या आयशर (क्रमांक एमएच १६ सीए ७७४७) ने विरुळ येथील पेट्रोलपंपाजवळ उभ्या ट्रकला जबर धडक दिली. यामध्ये चालक सिमरन शेख (वय २६) रा. ढवळपुरी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर हा गंभाररीत्या जखमी झाला. अपघातात नासिर शेख (वय ३०) रा. हिवरे (कोरडा) तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर याचा केबिनमध्ये फसल्याने जागीच मृत्यू झाला.
दोघांनाही क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढून हायवे अॅम्बुलन्सद्वारे उपजिल्हा रुग्णालय पुलगाव येथे नेण्यात आले. घटनास्थळी बॅरिकेटींग करण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. पुलगाव पोलिस ठाण्याचे अमलदार हजर होते. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.