Parbhani crime :- परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील सायळा पाटी येथे झालेल्या मारहाण प्रकरणातील गंभीर जखमी तरुणाचा मृत्यु (Death) होऊन दहा दिवस झाले तरी एक आरोपी अद्याप फरारच असल्याने मृतक विष्णू पवार या तरुणाच्या कुटुंबीयांनी तपास यंत्रणेवर संशय व्यक्त करत जलसमाधी घेण्याचा इशारा पोलीस अधिक्षक रविंद्र सिंह परदेशी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
चार जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
गंगाखेड तालुक्यातील सायळा सुनेगाव येथील विष्णू उर्फ सचिन मारोतराव पवार यास दि 3 मे रोजीच्या मध्यरात्री त्याच्या मित्रानी गंभीर जखमी अवस्थेत गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल केले होते. याप्रकरणी नातेवाईकांनी संशय व्यक्त करत दिलेल्या तक्रारीवरून 5 मे रोजी चार जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गंभीर जखमी विष्णू पवार या तरुणाचा परभणी येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना 8 मे रोजी मृत्यु झाल्यामुळे यात खुनाच्या (Murder) गुन्ह्याचे कलम वाढविण्यात आले होते. गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर चार जणांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली. मात्र एक जण अद्याप फरारच असल्याने व यातील एका आरोपीच्या भावाने गुन्ह्यातून माझ्या भावाचे नावं परत घे नाहीतर तुला सुद्धा तुझ्या भावासारखे मारून टाकू अशी धमकी मृतक तरुणाच्या भावाला दिल्यामुळे 11 मे रोजी त्याच्याविरुद्ध अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
अटकेत असलेल्या या गुन्ह्यातील तिन्ही आरोपीना पाच दिवसांची पोलीस कोठडी घेऊन सुद्धा आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासंदर्भात तसेच मारहाणीच्या कारणासंदर्भात कोणतीच माहिती समोर आली नसल्यामुळे तपासाची गती वाढवुन फरार आरोपी जयदेव सूर्यवंशी यास तात्काळ अटक करावी अशी मागणी मृतक तरुणाचा भाऊ माधव मारोतराव पवार व अन्य नातेवाईकांनी पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, गंगाखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांची भेट घेऊन केली आहे.