परभणी (Parbhani Crime) : तु माझ्या मित्रासोबत भांडण का करतोस असे म्हणत शिवीगाळ करून कॉलर पकडून थापडबुक्यांनी मारहाण करणार्या युवकाला दोघांनी काठीने मारून जबर जखमी केले. उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाला. सदर प्रकरणात (Parbhani Crime) स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तपास करत दोन आरोपींना ताब्यात घेतले. खूनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली असून, मयताच्या मित्रासोबत भांडण करण्याचे निमित्त युवकाच्या खूनाचे कारण ठरले.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाची कामगिरी
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार ७ जून रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान खदीर उर्फ बब्बू दस्तगीर खान याचा मृत्यू झाला होता. मयताच्या अंगावर जबर मारहाणीच्या खुणा होत्या. खदीर याचा अज्ञातांनी खून केला आहे. अशी तक्रार (Nanalpet Police) नानलपेठ पोलीसात देण्यात आली. स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. पी.डी. भारती, पोउपनि. गोपिनाथ वाघमारे, अजित बिरादार, चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार बाळासाहेब तुपसुंदरे, रवि जाधव, दिलावर खान, रंगनाथ दुधाटे यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला.
दोघांना घेतले ताब्यात, खूनाचे गुड उकलले
पोलीसांना (Nanalpet Police) मदिना पाटी येथील दोघांनी मिळून खदीरचा खून केल्याची माहिती मिळाली. सापळा रचत आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केल्यावर संबंधितांनी घडला प्रकार सांगितला. मयताने आरोपींना तु माझ्या मित्रासोबत भांडण का करतोस असे म्हणत शिवीगाळ केली. मित्राला का त्रास देता, दम असेल माझ्या सोबत खेटा असे म्हणत कॉलर पकडून थापडबुक्यांनी मारहाण केली. याचा राग आल्याने आरोपी शेख नदीम उर्फ नड्डा आणि समीर या दोघांनी खदीरला लाकडी काठीने मारहाण केली. बेशुध्द पडेपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपी धार रोडवरील शेतात जावून झोपी गेले. जखमी खदीर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीसांनी शेख नदीम उर्फ नड्डा, समीर या दोघांना ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा तपास नानलपेठ पोलीस (Nanalpet Police) करत आहेत.
