परभणी (Parbhani) :- पूर्णा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत व्यवहार करण्यासाठी आलेल्या तालुक्यातील मौजे चांगेफळ येथील एका शेतकर्याचे (Farmer) कॅश काउंटरवर ठेवलेले १ लाख ९० हजार रुपये अज्ञात चोरट्याने परस्पर लांबवल्याची घटना बुधवार ९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता घडल्याचे उघडीस आली आहे. या प्रकरणी पूर्णा पोलिसांत घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
परभणीतील पूर्णा येथील एसबीआय बँकेतील प्रकार पूर्णा पोलीसांत घटनेची नोंद….!
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील चांगेफळ येथील रहिवासी असलेले देवराव मारोतराव बुलंगे यांचे पूर्णा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत खाते आहे. बुधवार ९ एप्रिल रोजी एका नातेवाईकांना पैसे द्यायचे असल्याने ते बँक खात्यावरील रक्कम काढण्यासाठी दुपारी बँकेत आले होते. तत्पूर्वी त्यांनी आपल्या शेतातून निघालेली तूर बाजार समितीच्या आवारातील बोकारे ट्रेडिंग कंपनी यांना विक्री केली होती. विक्रीतून आलेले १ लाख ५० हजार रुपये तसेच अन्य एकाकडून हात उसने घेतलेले चाळीस हजार रुपये असे एकूण १ लाख ९० हजार रुपये घेऊन येथील स्टेट बँकेच्या शाखेत गेले. दरम्यान खात्यावरील रक्कम काढण्यासाठी चेक लिहीत असताना त्यांच्याजवळ पिशवीत असलेले १ लाख ९० हजार रुपये बँकेच्या काउंटरवर ठेवले होते. त्यांच्या पाठीमागे उभे असलेल्या एका अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून पैसाची पिशवी हातोहात पळवली. हा सर्व प्रकार बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला असून, चोरटा पिशवी खाली लपवून पैसे घेऊन जात असताना स्पष्ट दिसत आहे. घटनेची माहिती शाखा अधिकारी यांनी तातडीने स्थानिक पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, अण्णा माने, मंगेश यांनी घटनास्थळी धाव घेतली. तो पर्यंत चोरटा पसार झाला होता.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व त्यांची टिम करत आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून व्यापारी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कारण मागच्या दोन महिन्यापुर्वी येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असीच घटना घडली होती. एसबीआय व महाराष्ट्र बँक (Maharashtra Bank) एकाच परिसरात आहेत व हा परीसर गर्दीचा आहे. या परीसरात कोणताच पोलीस बंदोबस्त नसतो, याचाच फायदा चोरटे घेत असतात.