वलांडी (Latur):- शाळेत खेळण्या बागडण्याच्या वयात पुस्तकी ज्ञानासोबतच व्यवहार काय असतो, आपला माल विक्री कसा करायचा अन् हिशोबाने पैसे कसे कमवायचे याचा अनुभव देण्यासाठी देवणी तालुक्यातील जवळगा येथील येथील जिल्हा परिषद प्रशालेत आनंद बाजार भरला होता. आनंद बाजार एक अभिनव प्रयोग राबविण्यात आला. या बाजारात पालक, ग्रामस्थ हे ग्राहक झाले अन् मुले विक्रेते. विद्यार्थ्यांनी भरविलेल्या या बाजारात तीन तासांतच लाखांची उलाढाल खरेदी विक्रीचा व्यवहार झाला. यानिमित्ताने चिमुकल्यांनी व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव घेतला.
तीन तासांचा बाजार : व्यावसायिक बनले जिल्हा परिषदेचे विद्यार्थी
प्रशालेत स्काऊट गाईड अभियान अंतर्गत आनंद मेळावा भरला होता. शाळेतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध पदार्थांची सुमारे ऐंशीच्या वर दुकाने व स्टाॅल (Stall)लावले. या बाजाराचे उद्घाटन डॉ.जनार्धन बिरादार यांच्या हस्ते करण्यात आले. तर यावेळी शालेय व्यवस्थापन अध्यक्ष अनिल पाटील, सरपंच प्र. विजयकुमार वामनराव पाटील ग्रामपंचायत सदस्य,पालक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाकडून प्रथम येणाऱ्या स्टाॅलला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. या बाजारात विद्यार्थ्यांनी पालक, वांगे, बटाटे, टोमॅटो, कोथिंबीर, बीट, पपई, भोपळा, विविध फळे, इडली, दोसा, पोहे, अप्पे, वडापाव, सुशिला, रोटी भज्जी, मिरची भजे, भेळ, पाणीपुरी, पावभाजी, डोसा, मसालेदार, मसाला पापड, चणे, चहा, गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट व कुरकुरे यांची दुकाने लावली होती. गावातील लहान थोर नागरिकांसह महिला व तरुणांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत व खरेदी केल्याने १ लाख ३ हजार ४३० रुपयांची उलाढाल झाली. बाजारात चिमुकल्यांकडून खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती.
याप्रसंगी ग्रामस्थांनी आवडीने खाऊचा आस्वाद घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना गणिती संकल्पना, नफा-तोटा, व्यवहारज्ञान कौशल्य, विद्यार्थ्यांना (Students)अनुभवातून शिकायला मिळाले. बाजारात चिमुकले दुकानदार आणि खरेदीदार यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक दत्तात्रय कदम, उपक्रमशील शिक्षक लक्ष्मण चिंते, पांडुरंग येलमटे, बाळासाहेब कांबळे, विठ्ठल केंद्रे, शिवकुमार बिरादार, मंजुषा सुडे, राजकुमार सोनकांबळे, सुनिता सावंत,आदींनी या उपक्रमाचे नियोजन केले होते.