काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीसह पक्षातंर्गत उमेदवारांचा शोध सुरु
आरक्षण बदलामुळे शर्यत रंगतदार होणार …!
परभणी (Parbhani Zilla Parishad) : ग्रामविकास मंत्रालयाने शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहिर केले आहे. परभणी जिल्हा परिषद (Parbhani Zilla Parishad) अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली असून, विविध पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.
मुंबई येथे शुक्रवारी ग्रामविकास मंत्रालयाचे सहसचिव ए.एम. भरोसे यांनी राज्यातील ३२ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षण निश्चितीची अधिसूचना जाहिर केली आहे. या मध्ये परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अडीच वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद गठीत होऊन लगतनंतरच्या दिवसापासून सुरु होणार्या अडीच वर्षासाठी हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
मागील कार्यकाळात अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते. मात्र यंदा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने अनेक पक्षांतील इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत आली आहेत. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच स्थानिक स्वराज्यात प्रभाव असलेल्या इतर गटांनीही रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सक्षम व प्रबळ उमेदवारांचा शोध घेतला जाणार आहे. त्यामुळे (Parbhani Zilla Parishad) अध्यक्षपदाची निवड ही राजकीय दृष्टीने महत्वाची ठरणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून कोणत्या पक्षाचा उमेदवार जिल्ह्याच्या नेतृत्वावर विराजमान होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.