पाटणबोरी ग्राम पंचायतचा भोंगळ कारभार, सरपंच-सचिवावर कार्यवाहीची मागणी
पांढरकवडा (Patanbori Gram Panchayat) : शासनाच्या विकास कामाच्या निधीची अनेक ग्राम पंचायतचे सरपंच, सचिव पुर्ती वाट लावतांना दिसत आहे. असाच एक प्रकार तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत (Patanbori Gram Panchayat) असलेल्या पाटणबोरी येथे घडला आहे. येथे जनसुविधेच्या निधीतील रस्त्याचे लोकेशन बदलवुन चक्क खाजगी शाळेच्या जागेतुन रस्ता तयार करण्यात आला आहे.
याबाबत ग्राम पंचायतचे माजी सदस्य अनिल भागानगरकर यांनी जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास मंत्री ना अशोक उईके यांच्याकडे लेखी तक्रार १८ ऑगस्ट रोजीच केली आहे. मात्र या दिड महिण्याच्या कालावधीत संबधित ग्रा.पं.च्या दोषी सरपंच, सचिव व अभियंत्यासह खाजगी राजकीय ठेकेदारावर सुध्दा कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
तालुक्यातील सर्वात् मोठी पाटणबोरी ग्रा.पं. (Patanbori Gram Panchayat) नेहमीच विविध कारणाने चर्चेत राहत आली आहे. नियमबाह्य कामे करण्याची येथे जणु स्पर्धाच सुरु असते. सन २०२४-२५ अंतर्गत जनसुविधेच्या निधीतुन बस स्थानकापासुन तर शाळेपर्यतचा ७ लक्ष रुपयांचा रस्ता मंजुर करण्यात आला होता. मात्र ग्रा.पं.च्या सरपंच,सचिव व खाजगी राजकीय ठेकेदाराने या रस्त्याचे लोकेशन बदलवुन चक्क तो सिमेंट रस्ता गावातील श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या खाजगी जागेत केला. खाजगी संस्था व जागेवर शासनाच्या निधीतुन कोणतीही कामे करता येत नाही. मात्र आपल्या राजकीय स्वार्थाकरीता खाजगी ठेकेदाराने चक्क लोकेशन बदलवुन खाजगी शाळेच्या जागेत रस्ता करुन दिला.
आपल्या युवा प्रदेशच्या पदाची भिती दाखवुन शासनाच्या निधीचा दुरुपयोग करणार्या या राजकीय ठेकेदाराच्या तालावर (Patanbori Gram Panchayat) ग्रा.पं.च्या सरंपच, सचिव तथा पंचायत समितीचे अभियंते नाचत असल्याने गावातील नागरिकांतुन रोष व्यक्त करण्यात येत आहे. सामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाकडुन निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. परंतु ग्रा.पं.चे ग्रामसेवक तथा पंचायत समितीचे अभियंते आपल्याच कर्तव्यात कसुर करुन राजकीय ठेकेदारांच्या ताटाखालचे मांजर बनुन काम करीत असल्याचे या रस्ता कामावरुन दिसुन येत आहे.
विशेष म्हणजे या रस्ता कामाची दिड महिण्याआधीच आदिवासी विकास मंत्री व जिल्हाधिकार्याकडे लेखी तक्रार करण्यात आलेली असतांना अद्याप पर्यत संबधितावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने राजकीय मार्गाने सदर प्रकरण निस्तारण्यात येत असल्याचीही चर्चा गावात सुरु आहे.