10 हजार रुपयांचे नुकसान, 7 जणांवर गुन्हा दाखल!
परभणी (Police Vehicle) : परभणीतील गंगाखेड येथे रात्र गस्तीवर असलेल्या पोलीसांच्या वाहनावर (Police Vehicle) सहा ते सात जणांनी दगड फेकत वाहनाची काच फोडून दहा हजार रुपयांचे नुकसान करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना 25 मे रोजीच्या मध्यरात्री 12:25 वाजेच्या सुमारास गंगाखेड रेल्वे स्थानक (Gangakhed Railway Station) परिसरत घडली. याप्रकरणी सोमवार रोजी पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधाराचा फायदा घेऊन गल्ली बोळातून पळून गेले!
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेस पोलीस ठाण्यातील पोलीस जमादार गणेश चनखोरे, पो.शि. राहुल खाडे, चा.पो.शि. शेख खलंदर आदी पोलीस कर्मचारी (Police Personnel) 25 मे रोजी रात्री रात्र गस्तीवर असतांना 26 मे रोजीच्या प्रारंभी 12:25 वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात पोहचले असता तेथील एका बंद दुकानाच्या बाहेर लाईटच्या उजेडात 20 ते 30 वर्ष वयोगटातील पाच ते सहा मुले विनाकारण बसलेली दिसल्यामुळे पोलीसांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले असता, याचा राग मनात धरून तेथून निघून जातांना त्यांनी पोलीसांना दुखापत करण्याच्या उद्देशाने पोलीस बसलेल्या शासकीय वाहनाच्या (Government Vehicle) पाठीमागील काचावर दगड फेकून मारत अंधाराचा फायदा घेऊन गल्ली बोळातून पळून गेले. तेंव्हा पोलीसांनी त्यांचा पाठलाग केला असता पळून जाणाऱ्यांपैकी एकाचा मोबाईल रस्त्यावर पडला तो मोबाईल ताब्यात घेऊन पोलीसांनी मोबाईल धारक व अन्य एकाचे नावं निष्पन्न केले. त्या दोघांची नावे बबन विष्णू दुधाटे व भगवान उर्फ भग्या यादव वाळके अशी असल्याचे समजल्याने पो. ह. गणेश चनखोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघांसह अन्य चार ते पाच अशा एकुण सात जणांवर शासकीय वाहनावर दगडाने हल्ला करून काच फोडत अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सोमवार रोजीच्या पहाटे दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर हे करीत आहेत.