Rajura :- राजुरा शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या रामपूर, धोपटाळा व परिसरातील विजेचा पुरवठा तब्बल २२ तासांहून अधिक काळ खंडित राहिल्याने गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दि. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरु झालेला हा अंधाराचा खोळंबा २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत कायम राहिला आहे. वृत्त लिहत पर्यंत विज पुरवठा (Power supply) बंदच होता. गणेशोत्सवाच्या काळात घराघरात दिव्यांच्या रोषणाईने आनंदोत्सव साजरा व्हावा अशी अपेक्षा असताना, सलग खंडित झालेल्या विजेमुळे भक्तांच्या आनंदावर विरजण पडले. नागरिकांनी संताप व्यक्त करताना ‘एमएसईबीचा ढिसाळ कारभार आम्हाला दिवसरात्र वेठीस धरतो, ‘अशा कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली.
गणेशोत्सव काळात नागरिक हैराण, एमएसईबीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, मागील काही महिन्यांपासून रामपूर, धोप टाळा, सास्ती आणि परिसरातील विज पुरवठा वारंवार खंडित होत असून, अनेकदा तासन्तास तो सुरू होत नाही. ग्रामस्थांनी वेळोवेळी एमएसईबी कार्यालयात तक्रारी नोंदवल्या तरी ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. ‘उत्सव काळात तरी सातत्याने विज मिळावी, ही योग्यच आहे. मात्र प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय असल्याने आम्हाला अंधारातच राहावे लागत आहे,’ असे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनाही या प्रश्नावर नागरिकांनी वारंवार विनंती केली असली तरी विज खंडित होण्याची समस्या अद्याप कायम आहे. परिणामी एम एस ईबी च्या ढिसाळ नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, सर्वसामान्य जनतेत प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.