कोरची तालुक्यातील अति दुर्गम गावात पक्क्या रस्त्याचा आणि पुलांचा अभाव
कोरची (Pratapgad Village) : तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले आणि अति दुर्गम म्हणून ओळखले जाणारे प्रतापगड गाव आजही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे. शासनाच्या अनेक दाव्यांनंतरही या गावात ना रस्ता, ना पूल, ना आरोग्यसुविधा, ना शिक्षणाची योग्य सोय, अशी विदारक स्थिती आहे.
नुकतीच खोब्रामेंडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या (Pratapgad Village) प्रतापगड गावाला केरामी साहेबांनी भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. एडजल गावापासून सुमारे 2 किलोमीटर पायदळ डोंगरमय मार्ग पार करून या गावात पोहोचावे लागते. पावसाळ्यात तर संपूर्ण संपर्क तुटतो. सौंदर्याच्या आड अडचणी चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं, निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं प्रतापगड गाव सौंदर्याने जरी मन मोहवत असलं, तरी प्रत्यक्षात आरोग्य, शिक्षण, वाहतूक, आपत्कालीन सेवा या सर्वच सुविधा पूर्णतः कोलमडलेल्या आहेत.
4 वर्षांपासून रखडलेली मागणी
केरामी साहेबांनी याआधीच जिल्हा परिषदेपुढे दोन पूल आणि पक्का रस्ता यासाठी मागणी केली होती. मात्र चार वर्षे उलटूनही शासन आणि प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. सध्याचे आमदारही कोटगुल क्षेत्राकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप केरामी यांनी यावेळी केला. कोटगुल भागाचा वाली कुणीच नाही का? असा प्रश्न त्यांनी थेट उपस्थित केला.
गावकऱ्यांचे जीवनमान हालाखीचे
पावसाळ्यात पूल नसल्यामुळे गावाचा इतर भागांशी संपर्क तुटतो. (Pratapgad Village) आजारी रुग्ण, गर्भवती महिला, शाळकरी मुले यांना जिवाच्या आकांतात प्रवास करावा लागतो. आपत्कालीन परिस्थितीत वाहन पोहोचण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
लवकरच पाठपुरावा करणार- केरामी
गावकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर केरामी साहेबांनी आश्वासन दिले की, “या प्रश्नाची दखल घेऊन शासन दरबारी सर्वतोपरी पाठपुरावा करू. हा रस्ता आणि पूल हे गावाचे हक्काचे आहेत.” उपस्थित मान्यवर या दौऱ्यात पूनमचंद लाडे (अध्यक्ष, ओबीसी सेल, कोरची), योगराज धमगाये (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कोरची), प्रकाश मडावी यांच्यासह अनेक स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. शासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन रस्ता व पूल उभारणीसाठी निधी मंजूर करावा, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.