कोल्हापूर-नागपूर रेल्वेत १४ लाखाची चोरी!
परभणी (Railway Police) : कोल्हापूर-नागपूर या रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशाजवळील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम मिळून १४ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याची घटना ७ ऑक्टोबर रोजी पहाटे ३.१५ च्या सुमारास पूर्णा रेल्वे स्थानकावरुन गाडी सुटल्यानंतर उघडकीस आली होती. सदर प्रकरणात लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नागपूर लोहमार्ग पोलिस विभागातील पोलिस कर्मचार्यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे गुन्ह्याची (Crime) व्याप्ती वाढली आहे.
लोहमार्ग पोलिसांची उडवाउडवीचे उत्तर!
सदर प्रकरणी गणेश शांतीलाल राठी यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे आपल्या पत्नी सोबत कोल्हापूर – नागपूर एक्सप्रेसने प्रवास करत होते. गाडी पूर्णा रेल्वे स्थानकावरुन निघाल्यावर त्यांच्या पत्नी जवळील बॅग चोरीला गेल्याचे समजले. या बॅगमध्ये सोन्याचे नेकलेस, कानातील झुमके, अंगठी, मोबाईल, चांदीचे पायल व जोडवे, रोख रक्कम व इतर कागदपत्रे होती. चोरट्यांनी एकूण १४ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याआधारे आरोपी बाळु गणपत चव्हाण, वय ४० वर्ष रा.तरोडा नांदेड यास ताब्यात घेतले. अधिक विचारपूस केली असता सदरील चोरी पोलीस कर्मचारी अक्षय यांच्या सोबत हातमिळवणी केल्याची माहिती लोहमार्ग पोलीसांना दिली. मात्र घटनेच्यापाच दिवसानंतरही तपासामध्ये गती दिसत नाही. त्यातच नागपूर डिव्हीजन मधील लोहमार्ग पोलीस कर्मचारी अक्षय हा चोरांशी हात मिळवणी करुन चोरी केल्याची कबुली दित्यानंतरही लोहमार्ग पोलिस माहिती लपवत आहे. सदरील चोरी मधील ७ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून बाकीचा मुद्देमाल कुठे गेला ? याची माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. सदरील चोरीचा तपास रेल्वे लोहमार्गचे पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. वृत्त लिहीपर्यंंत नांदेड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे (Nanded Railway Police Station) प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत पांचाळ यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. यांचा अर्थ तपासात कुठेतरी गौडबंगाल आहे. असे दिसत आहे.