महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन!
नांदेड (Reading Inspiration Day) : मिसाईल मॅन, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून येथील सायन्स कॉलेज, नांदेड (Science College, Nanded) येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ (Reading Inspiration Day) उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रणजित धर्मापुरीकर आणि पिपल्स कॉलेजचे ग्रंथपाल संदीप गायकवाड उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि वाचनाचे महत्त्व समजावून सांगून, त्यांच्या भविष्यातील शिक्षण (Education) व व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत बोधपर मार्गदर्शन केले.
स्पष्टपणे आणि सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन!
आपल्या भाषणात प्रा. धर्मापुरीकर यांनी वाचन म्हणजे काय, विविध देशांची वाचन समृद्धी, इस्रायल आणि हंगेरीमधील शिकवण, वाचकांना होणारे लाभ, वाचनाची सुरुवात कशी करावी व त्याची संसाधने, वाचनाचे प्रकार, वाचण्याची आवड वाढवण्यासाठीचे उपक्रम, तसेच वाचनाकडे कमी कल असण्याची कारणे, अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर अगदी स्पष्टपणे आणि सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे, पीपल्स कॉलेज, नांदेड येथील ग्रंथपाल संदीप गायकवाड यांनी अत्यंत प्रेरणादायी भाषण करून सर्व विद्यार्थ्यांना (Students) उच्च शिक्षणासाठी वाचनासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी आजच्या सत्य परिस्थितीचे वर्णन करून विद्यार्थ्यांना ‘वाचाल तर वाचाल’ या म्हणीनुसार वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले संदर्भ ग्रंथ व पुस्तके उपलब्ध!
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत सुतकर यांनी केले, तर उपप्राचार्या डॉ. अरुणा शुक्ला यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य डॉ. एल.पी. शिंदे यांनी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित करताना सांगितले की, ‘महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेले सर्व संदर्भ ग्रंथ व पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत, तरी विद्यार्थ्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून आपले जीवन उज्वल करावे आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा.’
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथालयातील कर्मचारी संतोष पांडे, महेश डोंगरकर, पांडुरंग कदम, श्रीमती पार्वती माने, कु. वैष्णवी राजूरकर, श्रीमती श्रद्धा जोशी सह आदींनी विशेष परिश्रम घेतले.