लोकप्रतिनिधीने सुचविलेल्या कामांच्या याद्या प्रशासनाने सादर कराव्यात
जिल्हा नियोजन समितीची सभा
भंडारा (Minister Dr. Pankaj Bhoyar) : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी सुचविलेल्या कामांच्या याद्या प्रशासनाने सादर करण्याचे निर्देश देत मंत्रालयात धान खरेदीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर (Minister Dr. Pankaj Bhoyar) यांनी जिल्हा नियोजन समितीच्या दि. १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेत सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीला जि.प. अध्यक्षा कविता उईके, आ. नरेंद्र भोंडेकर, आ. नाना पटोले, आ. राजू कारेमोरे, खा. डॉ. प्रशांत पडोळे (MP Prashant Padole), जिल्हाधिकारी सावन कुमार, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे, यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. दि. ६ जून २०२५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेची इतीवृत्त कायम करण्यात आले.
भंडारा जिल्ह्यातील प्रश्न मांडताना खा. पडोळे यांनी भागडी गावातील जलजीवन मिशन ने केलेल्या कामाबाबत प्रश्न निर्माण केले तसेच दूषित पाणी तसेच या गावात नागरिकांना पिण्याचे दूषित पाणी मिळत असल्याबाबतची बाब निदर्शनास आणून दिली. यावर पालकमंत्री (Minister Dr. Pankaj Bhoyar) यांनी याबाबत चौकशीचे निर्देश प्रशासनाला दिले व संबंधितावर कारवाई करण्याचे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी २०२४-२५ मध्ये झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन विकास समिती द्वारे प्राप्त कामांचा आढावा जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरी गट्टे यांनी सादर केला. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत २०२५-२०२६ अंतर्गत एकूण मंजूर नियतव्यय २७६ कोटी आहे. दि. १ ऑगस्ट २०२५ च्या शासन मार्गदर्शक सूचनानुसार खरेदीची कमाल मर्यादा १० टक्के तर पुनर्विनोयजनची कमाल मर्यादा १० टक्के असून सुधारित प्रशासकीय मान्यतेची मर्यादा सुद्धा ३० टक्के अनुदान करण्यात आलेली असल्याची माहिती श्रीमती बोरीगटटे यांनी दिली.
२७६ कोटी रुपये मंजूर निधी पैकी दि. ३० सप्टेंबर पर्यंत ३०.७६ टक्के निधी खर्च झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पालकमंत्री डॉ. भोयर (Minister Dr. Pankaj Bhoyar) यांनी विभागनिहाय कामाचा आढावा यावेळी घेतला. बैठकीमध्ये विविध लोकप्रतिनिधींनी आपले मत मांडले. तसेच विविध मुद्द्यांवर पालकमंत्री महोदयांचे लक्ष वेधले. यामध्ये प्रामुख्याने आ. राजू कारेमोरे (MLA Raju Karemore) यांनी धान खरेदी व धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत तसेच बोनसचे पैसे मिळण्याबाबतचे प्रश्न मांडले. त्यावर धान खरेदी बाबत लवकरच मंत्रालयात स्वतंत्र बैठक लावणार असल्याचे भोयर यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके यांनी जनसुविधेच्या कामासाठी निधी मिळण्याची मागणी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी नोंद घेऊन, याबाबत सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामांच्या याद्या प्रशासनाने पालकमंत्री कार्यालयाला एकत्रितरित्या सादर करण्याचे निर्देश दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबतच्या प्रश्नाबाबत आ.भोंडेकर यांनी मांडलेल्या मुद्याची दखल पालकमंत्र्यांनी घेतली. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे त्यांनी आश्वस्त केले. जिल्ह्यातील वर्ग खोल्या व शाळा बांधकामासाठीचे प्रस्ताव तसेच नवीन रुग्णालय उभारण्याकरीता आवश्यक असलेल्या जागेच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकार्यांनी बैठक घेऊन याबाबतीतला अहवाल सादर करावा.
आदिशक्ती शीतला माता मंदिर याला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी खा. डॉ. पडोळे यांनी केली असता त्याबाबत लवकरच भंडारा नगरपालिका प्रशासनाने संबंधित जागेची पाहणी करून तसा अहवाल देण्याचे व प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले.
जिल्ह्यातील वन्य प्राणी व मानव संघर्ष याबाबत वनविभागाने सर्वेक्षण करून तसा अहवाल शासनास द्यावा, असे ही पालकमंत्री (Minister Dr. Pankaj Bhoyar) यांनी निर्देश दिले.
सभेचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरीगट्टे यांनी केले. तत्पूर्वी जिल्हा नियोजन सभागृहातील तळमजल्यावर असलेल्या पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर (Minister Dr. Pankaj Bhoyar) , आ. नाना पटोले, खा. प्रशांत पडोळे, आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सामान्य नागरिकांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पालकमंत्री कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केले आहे.