सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त भाजपा महानगर शाखेचे उपक्रम!
परभणी (Run For Unity) : राष्ट्रीय एकता दिवस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भाजपा परभणी महानगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री ना. मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह हजारो परभणीकर यांनी रन फॉर युनिटी पदयात्रा रॅलीत सहभाग नोंदवला.
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘सरदार १५० एकता अभियान’ अंतर्गत जिल्हास्तरावर ३१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत जिल्ह्यात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी भाजपा महानगर शाखेच्यावतीने रन फॉर युनिटी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री ना.सौ. मेघनाताई बोर्डीकर, माजी मंत्री सुरेशराव वरपूडकर, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, डॉ. केदार खटिंग, सौ. प्रेरणाताई वरपूडकर यांच्या हस्ते गोमाता पूजन करण्यात आले. यानंतर ‘रन फॉर युनिटी’ या पदयात्रेला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून निघालेल्या या यात्रेचा समारोप गांधी पार्क येथे झाला. या पदयात्रेत हजारो परभणीकरांनी उत्साहाने सहभाग घेत, राष्ट्रीय एकता, अखंडता आणि देशभक्तीचा संदेश दिला. या वेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. विविध शासकीय अधिकारी, सामाजिक संस्था, विद्यार्थी, स्वयंसेवक आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.




 
			 
		

