केवळ पश्चिम आशियाच संपूर्ण जगात बेगडी शांतता प्रस्थापित करण्यासाठी धडपडणाऱ्या ट्रम्प यांना त्यांच्या खास दोस्तानेच ठेंगा दाखवला आहे. चारही बाजूंनी पसरलेल्या अरब राष्ट्रांच्या बेचक्यात अडकलेल्या इस्रायलची खरी ताकद त्याची अमेरिकेसोबत असलेली दोस्ती हीच आहे. इस्रायलची सगळी मस्ती अमेरिकेच्या जोरावर चालते हे उघड सत्य आहे. या पृष्ठभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष असलेले ट्रम्प गाझा पट्टीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी एखादा शांतता प्रस्ताव ठेवतात आणि तो इस्रायलचे पंतप्रधान धुडकावून लावतात ही एक अतिशय विस्मयजनक म्हणावी लागेल. नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा पट्टीसाठीचा शांतता प्रस्ताव जाहीरपणे फेटाळला. इस्रायलचे पंतप्रधान इतके धाडस दाखवू शकत असतील तर त्यामागे नक्कीच काहीतरी पाणी मुरत असले पाहिजे. ट्रम्पसारख्या वेगळ्या अर्थाने वेडपट परंतु अत्यंत शक्तिशाली नेत्याला अंगावर घेण्याची हिंमत हा चिमुकला देश दाखवत आहे, याचा अर्थ या देशाकडे काहीतरी रहस्य असायला हवे. माझ्यामुळे तुमचा देश टिकून आहे, अशी धमकीदेखील ट्रम्प यांनी नेत्यांनाहू यांना दिली, परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. इस्रायलचा आडमुठेपणा तसाच सुरू राहिला आहे. एपेस्टिन फाईल्स संदर्भात बरेच बोलले जात होते. या फाइल्सच्या धाकानेच ट्रम्प इस्रायलकडून इराण विरुद्ध युद्धात उतरले असेही म्हटले जात आहे. यात तथ्य असेल तर याच फाईलच्या जोरावर या पुढच्या काळातही नेत्यानाहू ट्रम्प आणि अमेरिकेला ब्लॅकमेल करतील यात शंका नाही. अलीकडच्या काळात अमेरिकी खासदारांनी ‘मोसाद’ च्या अमेरिकेतील वाढत्या क्रियाशीलतेवर चिंता व्यक्त केली होती. ही यंत्रणा अमेरिकी यंत्रणा, अधिकारी यांच्यावरच पाळत ठेवत असावी आणि त्यांच्यावर हेरगिरी करत असावी अशी भीती व्यक्त केली गेली. या पृष्ठभूमीवर मोसादच्या हाती काही अशा गोष्टीचा लागल्या नाहीत ना की त्यामुळे ट्रम्प केवळ चरफड करण्याकरिता दुसरे काहीही करू शकत नाही, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. यात तथ्य असेल तर केवळ अमेरिका-इस्रायल यांच्या संबंधांसाठीच नव्हे; तर संपूर्ण पश्चिम आशिया आणि जागतिक शांततेसाठी हा धोक्याचा इशारा म्हणावा लागेल. इस्रायलकडे अत्याधुनिक लष्करी साहित्य आहे हे मान्य केले तरी शेवटी इस्रायलला आपल्या लष्करी ताकदीसाठी अमेरिकेवरच अवलंबून राहावे लागते, हीदेखील वस्तुस्थिती आहे. मागच्या वेळी इराणने इस्रायलची कथित भक्कम बचाव यंत्रणा उघडी पाडली होती. त्यामुळे सध्या नेत्यानाहू ज्या पद्धतीने ट्रम्प यांना शिंगावर घेत आहे त्याबद्दल जागतिक पातळीवर आश्चर्य व्यक्त होत आहे. एपेस्टिन फाईल्स हा एक मुद्दा तर आहेच शिवाय अमेरिकेत असलेली यहूदी लॉबी हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या यहुदी लॉबीने अमेरिकेच्या प्रत्येक अध्यक्षास जेरीस आणले आहे. अमेरिकेतील वित्त, मनोरंजन, माध्यमे आणि अर्थातच राजकारण अशा विविधांगी क्षेत्रांत यहूदींचा मोठा प्रभाव आहे. त्यांना टाळणे जवळपास अशक्य ठरते. बिल क्लिंटन आणि बराक ओबामा या दोनच अध्यक्षांनी या यहुदी लॉबीला काबूत ठेवण्यात थोडेफार यश प्राप्त केले होते. नेतान्याहू यांनी इस्रायली फौजा गाझा पट्टीत घुसवल्या त्यावेळी ट्रम्प यांचा त्यांना पाठिंबा होता. कदाचित आपल्या एका इशाऱ्यावर इस्रायली फौजा माघारी येतील अशा भ्रमात ते होते. परंतु इस्रायलच्या हाती ट्रम्प यांची कुठलीतरी कमजोरी नक्कीच लागली आहे. त्यामुळेच ट्रम्प यांनी अगदी उघड धमक्या दिल्यानंतरही इस्रायल त्यांचे काहीच ऐकायला तयार नाही. नेत्यांनाहू यांच्या हट्टामुळे किंवा त्यांच्या ब्लॅकमेलिंगला घाबरून ट्रम्प यांनी अमेरिकेस इराणविरोधात युद्धात लोटले. त्यातून आपली मान सोडवणे ट्रम्प यांस अजूनही शक्य झालेले नाही. आता या युद्धातून इस्रायल नामानिराळा झाला आहे आणि अमेरिकाच पुरती अडकली आहे. एकूणच इस्रायलला आवर घालणे अमेरिकेच्या आणि जगाच्याही आवाक्यात राहिलेले दिसत नाही. चिमुकला इस्रायल अमेरिकेला भीक घालायला तयार नाही, रशियाने तर कधीच अमेरिकेची पत्रास ठेवली नाही. अशा परिस्थितीत जागतिक शांतता प्रस्थापित करण्यास निघालेल्या ट्रम्प यांची अवस्था अधिकच केविलवाणी झाली आहे. रशिया आपल्याला जुमानणार नाही हे ट्रम्प यांनी गृहीत धरले होते, परंतु इस्रायलकडून मिळालेला दणका त्यांच्यासाठी अतिशय वेदनादायी म्हणावा लागेल.
अग्रलेख
नेतान्याहू आवाक्याबाहेर...!
नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा पट्टीसाठीचा शांतता प्रस्ताव जाहीरपणे फेटाळला. इस्रायलचे पंतप्रधान इतके धाडस दाखवू शकत असतील तर नक्कीच काहीतरी पाणी मुरत असले पाहिजे.
By :
देशोन्नती डिजीटल »
•