अग्रलेख

गोलमाल भूमिका...!

स्वतः मोहन भागवतांनी अमेरिकेच्या भूमीवर संघाच्या हिंदुत्वाची व्याख्या अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मोहन भागवत यांनी न्यूयॉर्कमधील आपल्या भाषणात भारतातील विविधतेचे गुणगान गायले.

गोलमाल भूमिका...!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतीच अमेरिकेला भेट दिली. त्यांच्या या अमेरिका दौऱ्याला न्यूयॉर्कचे महापौर ममदानी यांनी विरोध केला होता. ममदानी यांनी संघाला धार्मिक विद्वेष पसरवणारी संघटना संबोधले होते. अर्थात ममदानी यांच्या विरोधाचा भागवत यांच्या दौऱ्यावर फारसा परिणाम झाला नाही; परंतु त्या निमित्ताने पुन्हा एकदा संघाच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर विविध माध्यमांमधून मोठी चर्चा घडून आली. स्वतः मोहन भागवतांनी अमेरिकेच्या भूमीवर संघाच्या हिंदुत्वाची व्याख्या अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मोहन भागवत यांनी न्यूयॉर्कमधील आपल्या भाषणात भारतातील विविधतेचे गुणगान गायले. याचा अर्थ संघाला भारतातील विविधता मान्य आहे असाच होतो; परंतु या विविधतेचा पाया सनातन हिंदुत्व आहे, या संघाच्या आजवर चालत आलेल्या भूमिकेबद्दल भागवतांनी कोणतेही भाष्य केले नाही. हिंदुत्वाची व्याख्या व्यापक करताना सगळ्यांना सामावून घेण्याची संघाची भूमिका असली, तरी इतरांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला संघ तयार आहे की नाही, या प्रश्नाचे उत्तर अजून तरी मिळालेले नाही. हिंदुत्वाची संकल्पना लोकांनी व्यापक अर्थाने स्वीकारावी यासाठी अवलंबलेली ही एक रणनीती असू शकते. भागवत यांनी यापूर्वीही भारतातील मुस्लीम हे ‘बाहेरचे’ नाहीत, अशी भूमिका मांडली आहे. सर्व धर्मांच्या लोकांनी सलोख्याने राहावे, असेही त्यांनी म्हटले आहे; परंतु संघाला मातृसंस्था मानणाऱ्या इतर अनेक हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका या विचारांच्या अगदी विपरीत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. भागवत यांनी ‘एखाद्या हिंदूला  मुस्लीमविरहित भारत हवा असेल, तर तो हिंदू नाही’ असे म्हटले आहे. मात्र, दुसरीकडे हिंदुत्वाच्या विचाराला मानणाऱ्या अनेक शक्ती सातत्याने मुस्लिमांना लक्ष्य करताना दिसतात. भागवत यांनी २०२२ मध्ये प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधण्याची गरज नाही, असे म्हटले होते. मात्र, त्यानंतर हिंदुत्वाच्या राजकारणाने त्याच्या नेमक्या उलट भूमिका घेतल्याचे दिसते. या पृष्ठभूमीवर आज मुस्लीम हे भारताचा भाग आहेत, असे भागवत म्हणत असतील, तर त्या वक्तव्याला फारसा अर्थ उरत नाही. कडवे हिंदुत्ववादी ज्या लोकांना आपला शत्रू मानतात, त्यांना माफ करायला तयार नसतात. सनातन धर्म हाच भारताचा एकमेव धर्म आहे ही त्यांची धारणा असते. अशा हिंदुत्ववाद्यांना संघाने कधी चार खडे बोल सुनावल्याचे ऐकिवात नाही. अगदी संघाशी संबंधित संघटनांचे नेते, संघाचे पदाधिकारी आणि त्यांची प्रकाशनेही अनेकदा सरसंघचालकांच्या आशावादी वक्तव्यांशी विसंगत विचार मांडत असल्याचे दिसते. संघाला मातृसंस्था मानणाऱ्या भाजपचे सरकार सध्या केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये आहे. या सरकारमधील अनेक नेत्यांकडून इतिहासाच्या पुस्तकांमधून मुघलांचा संदर्भ काढून टाकण्याची मागणी केली जाते. हिंदू हा शब्द कधी धर्म किंवा श्रद्धा, तर कधी एक संस्कृती या अर्थाने वापरला जातो, मात्र त्याच वेळी मुस्लिमांना ‘हिंदू’ सणांपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न केले जातात. हिंदुत्वाच्या विचारांचा प्रचार आणि प्रत्यक्ष व्यवहार या दोन्ही पातळ्यांवर ही भूमिका सतत बदलत राहते. त्यामुळे भागवत यांची सर्वसमावेशक भूमिका हा केवळ शब्दांचा खेळ ठरतो. मुळात भागवत सध्या कितीही मवाळपणा दाखवित असले, तरी संघाने गोळवलकर यांच्या काळापासून चालत आलेली विचारांची सातत्यता कधीही सोडलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. गोळवलकर यांच्या काळात भारतीय समाजाची रचना आणि संघटन याबाबत ज्या अनेक विचारांना महत्त्व दिले गेले, तेच विचार आज पुन्हा व्यवहारात येताना दिसतात. फार तर असे म्हणता येईल, की या विचारांची मांडणी करण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरली जाणारी भाषा संघाने बदलली. कदाचित आधुनिक काळात माध्यमांचा वापर आणि सत्तेचा संस्थात्मक पद्धतीने वापर करण्याच्या बाबतीत संघाने अधिक हुशारी दाखवायला सुरुवात केली असे म्हणता येईल. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन हिंदुत्व ही विचारसरणी खरोखर बदलली आहे का, त्यात मूलभूत आणि ठोस बदल झाले आहेत का, याचा विचार होणे गरजेचे आहे. केवळ काही निवडक वक्तव्यांच्या आधारे हिंदुत्व किंवा संघ बदलत असल्याचा निष्कर्ष काढणे ही चूक ठरू शकते. हिंदुत्वाला अधिक स्वीकारार्ह बनवणे हा भागवतांचा उद्देश नसून, हिंदुत्वाचे राजकीय आणि सामाजिक वर्चस्व कायम ठेवणे हे त्यांचे खरे ध्येय आहे, हे लक्षात घ्यायला हवे.