अग्रलेख

मृत्यूचे व्यापारी.......!

अमेरिका शस्त्रास्त्रांचे उत्पादन करणारा एक मोठा देश आहे. औषधी आणि शास्त्रास्त्रे या दोन उत्पादनांच्या जोरावर अमेरिका जगावर आपला अंकुश ठेवून आहे.

मृत्यूचे व्यापारी.......!

अमेरिका एक जागतिक महासत्ता आहे, यात वाद नाही. अमेरिकेचा डॉलर जागतिक व्यापाराचा कणा आहे, हे देखील निर्विवाद सत्य आहे, परंतु जगाचे नेतृत्व करू पाहणाऱ्या किंवा तशी क्षमता असलेल्या अमेरिकेच्या नियतीत मात्र प्रचंड मोठी खोट आहे. रशियाच्या विघटनानंतर खरे तर अमेरिकेला कुठलेही आव्हान राहिले नव्हते, आताही नाही. त्यामुळे अमेरिकेने स्वतः पुढाकार घेऊन संपूर्ण जगात शांतता नांदावी, सुबत्ता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते, परंतु अमेरिका आपल्या स्वार्थाच्या पलीकडे कधी पाहू शकली नाही आणि हा स्वार्थ देखील अत्यंत घातक होता किंवा आहे. आपल्या या स्वार्थामुळे जगाचे काय होते, याचा विचार करण्याची तसदी अमेरिकेने कधी घेतली नाही. अगदी अलीकडचे उदाहरणही अमेरिकेची स्वार्थलोलुपता उघडी पाडणारे आहे. शस्त्र व्यापार अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अनेक देशांमध्ये होत असलेले सशस्त्र संघर्ष किंवा युद्ध ही अमेरिकेची देण आहे. थोडासा सखोल अभ्यास केला तर या सगळ्या युद्धांमागे अमेरिकेचा मोठा हात असल्याचे अगदी सहज दिसून येते. जगात युद्ध भडकू द्यायचे आणि आपल्या शस्त्रांचा व्यापार त्या युद्धाच्या माध्यमातून करायचा, ही अमेरिकेची जुनी व्यापारनीती राहिली आली आहे. अर्थात, आजही या नीतीत फारसा बदल झालेला नाही. अमेरिकेकडे सध्या एफ-३५ या लढाऊ विमानांचा मोठा साठा आहे. अमेरिकेला तो विकायचा आहे, परंतु त्यासाठी गिऱ्हाईक मात्र मिळत नव्हते. भारत, पाकिस्तानसारखे देश आपल्या विमानांना पसंती देतील, म्हणजेच विकत घेतील, असे अमेरिकेला वाटत होते, परंतु अमेरिका या विमानांसोबत ‘सोर्स कोड’ आणि तंत्रज्ञान देण्यास तयार नाही, त्यामुळे कोणताही देश या विमानाच्या खरेदीत रुची दाखवण्यास तयार नाही. आता हा पडून असेल स्टॉक खपवण्यासाठी अमेरिकेने मोठी घातक चाल खेळली आहे. अगदी अलीकडच्या काळात येमेनमधील हुथी बंडखोरांनी सौदीवर हल्ले चढविले. अगदी मक्का शहरातदेखील हल्ल्यांची सूचना देणाऱ्या सायरनचे आवाज घुमू लागले. एका दुसऱ्या देशातील सशस्त्र बंडखोरांचा एखादा गट साक्षात अमेरिकेचे संरक्षण लाभलेल्या एखाद्या देशावर हल्ला करतो आणि अमेरिका त्याची दखलही घेत नाही, या गोष्टी अगदीच अतर्क्य म्हणता येणार नाही. सौदीमध्ये अमेरिकेचा लष्करी तळ आहे, परंतु चर्चा ही आहे की, अमेरिकेनेच हुथी बंडखोरांना सौदीवर हल्ले करण्यास प्रोत्साहन दिले, या बंडखोरांकडून अमेरिकेच्या जहाजांवर कोणताही हल्ला होणार नाही याची हमी अमेरिकेने घेतली आणि त्याचवेळी या बंडखोरांवर कोणतीही कारवाई करणार नाही, अशी हमी अमेरिकेने या बंडखोरांना दिली. त्याचा परिणाम हा झाला की, हुथी बंडखोरांनी सौदीवर जोरदार हल्ले चढविण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांमुळे सौदीची गाळण उडाली, त्यातच अमेरिकेने तटस्थ धोरण स्वीकारल्याने सौदीच्या अडचणी अधिकच वाढल्या. त्यानंतर अमेरिकेने सौदीसमोर एफ-३५ विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव ठेवला. चारही बाजूंनी अडचणीत आलेल्या सौदीला हा प्रस्ताव स्वीकारण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. अखेर सौदीने अमेरिकेकडून ४८ एफ-३५ विमानांच्या खरेदीचा सौदा केला. आता खिंडीत सापडलेल्या सौदीला अमेरिका पुरता नागवणार, यात शंका नाही. रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला भरीस पाडत अमेरिकेने असेच नागवले होते. अजूनही युक्रेन अमेरिकेचा मोठा शस्त्रास्त्र ग्राहक आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात आजपर्यंत जितकी काही युद्धे झाली, त्यात कोणत्या ना कोणत्या बाजूने अमेरिकन शस्त्रास्त्रांचा वापर झालेलाच आहे. अमेरिका शस्त्रास्त्रांचे उत्पादन करणारा एक मोठा देश आहे. औषधी आणि शास्त्रास्त्रे या दोन उत्पादनांच्या जोरावर अमेरिका जगावर आपला अंकुश ठेवून आहे. शस्त्रांचा व्यापार अव्याहत सुरू ठेवायचा असेल तर जगात कुठे ना कुठे युद्धे सुरू राहिलीच पाहिजेत आणि ते युद्ध सुरू ठेवण्याची काळजी अमेरिका सतत घेत आली आहे. काही युद्धे तर वर्षानुवर्षे सुरू आहेत आणि काही युद्धांत तर दोन्ही बाजूंनी अमेरिकन शस्त्रांचा वापर केला जात आहे. एकूण काय तर अमेरिका आपल्या स्वार्थासाठी जगाला युद्धाच्या दरीत सतत ढकलत आली आहे. अमेरिका हा खऱ्या अर्थाने मृत्यूचा व्यापारी देश आहे. पाकिस्तानसारखा हक्काचा ग्राहक सध्या भिकेला लागल्यामुळे अमेरिका आता सौदीसारखे मोठे ग्राहक शोधत असल्याचे दिसते. त्यासाठी ज्या मार्गाचा वापर अमेरिका करत आहे, तो खरंच घृणास्पद म्हणायला हवा.