स्टेट लाइन

ममतादीदी एकाकी..

ममता बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हच निवडणूक आयोगाने गोठवले. पोटनिवडणुकीसाठी ममता अ. भा. तृणमूल काँग्रेस हे नाव व फूटबॉल खेळाडू हे चिन्ह दिले.

ममतादीदी एकाकी..

 ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील बंडखोरीने पश्चिम बंगालच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवल्याने ममता यांच्यासमोरील आव्हाने वाढली असून, काँग्रेसशी वाढती जवळीक आणि भाजपाविरोधातील लढाईला नवे स्वरूप येत आहे.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या ऐंशीपैकी अठ्ठावन्न आमदारांनी आणि लोकसभेतील बावीसपैकी तेरा खासदारांनी बंड पुकारले. विधानसभेतील आमदारांच्या गटाला अध्यक्षांनी तत्काळ मान्यता दिली आणि लोकसभेतील खासदार हे कोणालाही ठाऊक नसलेल्या एका पक्षात सामील झाले. महाराष्ट्रासारखा तोडफोडीचा प्रयोग पश्चिम बंगालमध्ये झाला. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व शरद पवार यांना खच्ची करण्यासाठी त्यांच्या पक्षांत बंडाचे झेंडे फडकले किंवा फडवले गेले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना शक्तिहीन करण्यासाठी त्यांच्या पक्षावर प्रहार झाले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व तृणमूल काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीच्या पटकथा थोड्याफार फरकाने सारख्याच होत्या. नेतृत्वावर अविश्वास दाखवून पक्षातून बाहेर पडायचे, नंतर मूळ पक्षावरच दावा सांगायचा, आमदार-खासदारांच्या संख्याबळावर विधानसभेत व निवडणूक आयोगाकडून बंडखोरांनी मान्यता मिळवायची व पक्षाचे अधिकृत चिन्हही प्राप्त करून विजय मिळवला म्हणून दंड थोपटायचे. निवडणूक आयोग स्वायत्त व घटनात्मक संस्था आहे. त्यांच्या निर्णयप्रक्रियेत कुणाला ढवळाढवळ करता येत नाही. न्यायालयात दाद मागितली तर वर्षानुवर्षे काहीच घडत नाही. मग जे पक्ष फुटले किंवा फोडले, त्यांची अवस्था केविलवाणी होते. त्यांचे नेते हतबल होतात. मी काही देऊ शकत नाही किंवा मी काही करू शकत नाही, असे सांगण्याची त्यांच्यावर वेळ येते.
ममता बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हच निवडणूक आयोगाने गोठवले. पोटनिवडणुकीसाठी ममता अ. भा. तृणमूल काँग्रेस हे नाव व फूटबॉल खेळाडू हे चिन्ह दिले. बंडखोर गटाला लोकशाहीवादी तृणमूल काँग्रेस हे नाव व लिफाफा हे चिन्ह दिले. ममता यांनी जन्म दिलेल्या तृणमूल काँग्रेसचे नाव एका फटकाऱ्यात निवडणूक आयोगाने गोठवून टाकले. या सर्वांत जास्त आनंद कुणाला झाला असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रात ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना व पवारांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर झाल्यावर त्याचा लाभ कुणाला झाला, हे सर्व महाराष्ट्र अनुभवतो आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे विभाजन झाल्यावर ज्यांना बंगाल काबीज करायचा होता, त्यांचा मोठा प्रतिस्पर्धी दुर्बल झाला. शिवसेना फोडल्याचे बक्षीस म्हणून एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळाले व आता ते उपमुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादीतून बाहेर पडले म्हणून अगोदर अजितदादा पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले व त्यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारस म्हणून सुनेत्रावहिनींना हेच पद देण्यात आले. त्याच सूत्राने ममता यांच्या तृणमूल काँग्रेसमधील एकेकाळचे निकटवर्तीय सुवेंदू अधिकारी यांना प. बंगालच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसविण्यात आले. महाराष्ट्रात किंवा पश्चिम बंगालमध्ये जनमत आणि संख्याबळ भाजपाच्या पाठिशी आहे. त्यापुढे उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा ममता बॅनर्जी यांना पुन्हा ताकदवान संघटना उभी करून भाजपाला आव्हान देणे आज तरी खूप कठीण आहे.
ममता बॅनर्जी यांची एक लढाऊ व आक्रमक नेत्या म्हणून ओळख आहे. बंगालची वाघीण म्हणून त्यांचा देशभर मीडियातून उल्लेख केला जायचा. याच वाघिणीने अठ्ठावीस वर्षे सत्तेवर असलेल्या डाव्या आघाडीला हटवले. त्याच ममता यांचे सलग पंधरा वर्षे सत्तेवर असलेले सरकार भाजपाने साम, दाम, दंड, भेद सारे मार्ग अवलंबून सत्तेवरून हटवले. विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पंधरा हजार मतांनी पराभव केला. त्याचे बक्षीस म्हणून भाजपाने त्यांना कोलकात्याच्या सिंहासनावर बसवले. पक्षाची सत्ता गेली, ममता यांचाच पराभव झाला, पक्ष दुभंगला, खासदार-आमदार फुटले. बंडखोरांनी तृणमूल काँग्रेसवर आमचा पक्ष म्हणून दावा सांगितला. ममता यांनी नंदिग्राम विधानसभा पोटनिवडणुकीत जाहीर केलेला उमेदवार थेट मुख्यमंत्र्यांना भेटला व आपण निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले. रेझीनगर मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील ममता यांचा उमेदवार पक्षाचे पाने व गवत हे निवडणूक चिन्ह आयोगाने गोठवले म्हणून हबकला. नव्या चिन्हावर कसे निवडून येणार, अशी त्याला भीती वाटू लागली. सकाळी म्हणाला, मी निवडणूक लढवणार नाही; दुपारी ममता यांना भेटल्यावर म्हणतो, मी लढवतो. असे द्विधा मनःस्थितीतील उमेदवार लढत तरी काय देऊ शकणार? सहा ऑक्टोबरला निवडणूक आहे. नऊ ऑक्टोबरला निकाल आहे. स्वतः ममता यांची भाजपाशी राजकीय व निवडणूक आयोगाशी कायदेशीर लढण्याची तयारी आहे. पण उमेदवारच घाबरून पळ काढणार असतील तर ममता तरी काय करू शकणार?
नंदिग्राममधून आपल्या उमेदवाराने मुख्यमंत्र्यांना भेटून मैदानातून पळ काढल्यावर ममता यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. ममता अगोदर काँग्रेसमध्येच होत्या. भाजपा विरोधातील इंडिया आघाडी बळकट झाली पाहिजे, असे त्या सतत सांगत आहेत. म्हणून नंदिग्राममध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्यावाचून त्यांच्यापुढे पर्याय तरी काय होता? पण त्यांनी पाठिंबा जाहीर करताच, काही वेळातच काँग्रेसच्या उमेदवाराला २००७ मध्ये नंदिग्राम आंदोलनात झालेल्या एका हत्या प्रकरणात पोलिसांनी लगेच अटक केली. त्याला अटक करण्याची तत्परता १९ वर्षांनी दाखवली गेली. काँग्रेस पक्ष व राहुल गांधी हे ममता यांच्या पाठिशी उभे आहेत, हे सर्व देशाला दिसून आले. निवडणूक आयोगाने त्यांच्या पक्षाचे नाव, चिन्ह गोठवल्यावर राहुल गांधी यांनी अगोदर शिवसेना, मग राष्ट्रवादी काँग्रेस व आता तृणमूल काँग्रेस तोच प्रयोग असल्याचे ‘एक्स’वर म्हटले आहे. ममता यांची सार्वजनिक कारकीर्द काँग्रेस पक्षातूनच सुरू झाली. आता पुन्हा २९ वर्षांनी त्या पुन्हा काँग्रेसच्या जवळ येत आहेत. त्या कोलकात्यात कॉलेजमध्ये शिकत असताना विद्यार्थी संघटनेत काम करायच्या. डाव्या पक्षांना विरोध करायच्या. आणीबाणीनंतर कोलकात्याच्या रस्त्यावर तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांना काळे झेंडे दाखविण्याचे धाडस केले होते, तेव्हापासून त्यांचे नाव राजकारणात झळकू लागले. 
१९८४ मध्ये त्यांनी मार्क्सवादी पक्षाचे दिग्गज नेते सोमनाथ चटर्जी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला तेव्हा त्यांचा जायंट किलर म्हणून उल्लेख झाला होता. १९९३ मध्ये त्यांनी सरकारचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या रायटर्स बिल्डिंगवर युवक काँग्रेसचा विराट धडक मोर्चा काढला. तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तेरा जण मृत्युमुखी पडले. तेव्हापासून ममता यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये दरवर्षी शहीद दिन पाळायला सुरुवात झाली. काँग्रेस पक्ष डाव्या आघाडीविरोधात आक्रमकपणे लढत नाही, म्हणून त्यांनी १९९८ मध्ये तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. वाजपेयी सरकारमध्ये त्या केंद्रीय मंत्री होत्या. २०११, २०१६ व २०२१ अशा तिन्ही विधानसभा निवडणुकीत राज्यात तृणमूल काँग्रेसची सत्ता आली. पण २०२६ मध्ये भाजपाने सर्व ताकद पणाला लावून त्यांना हटविण्यात यश मिळवले. 
भाजपाच्या रणनीतीपुढे ममता एकाकी पडत आहेत. पक्षाचे नाव व चिन्ह गोठविण्याचा आयोगाचा निर्णय पक्षपाती, घटनाबाह्य व बेकायदेशीर आहे, मी त्याच्याशी असहमत आहे, असे ममता यांनी म्हटले आहे. भाजपा विरोधातील लढाईसाठी काँग्रेस हाच त्यांना आधार आहे.

डॉ. सुकृत खांडेकर
ज्येष्ठ पत्रकार
मो. ९५९४२२४०००