पातूर (Charangaon Gram Panchayat) : तालुक्यातील चरणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच मेघा प्रमोद देशमुख यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम-१९५९ च्या कलम ३९(१) नुसार अपात्रतेची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी, ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांनी जिल्हाधिकारी, अकोला यांच्याकडे अर्ज सादर केला असून, सरपंच पदाचा गैरवापर केल्याचे आणि कर्तव्यात कसूर केल्याचे अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
आरोपांचे स्वरूप:
मासिक सभा न घेणे: सरपंच सौ. मेघा देशमुख यांनी (Charangaon Gram Panchayat) सरपंचपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सप्टेंबर २०२२, ऑक्टोबर २०२२, तसेच जानेवारी २०२३, फेब्रुवारी २०२३ आणि मार्च २०२३ या महिन्यांच्या मासिक सभा आयोजित केल्या नाहीत. या सभा न घेतल्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजात अडथळे निर्माण झाल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे.
बनावट कर्मचारी नियुक्ती: ग्रामपंचायत कर्मचारी नियुक्ती बेकायदेशीरपणे आणि नियमबाह्य पद्धतीने झाल्याचा आरोप आहे. त्यांच्या नियुक्तीचा ठराव आणि आदेश बनावट असल्याचे दिसून येते. तत्कालीन उपसरपंच सौ. वैशाली इंगळे आणि सचिव अशोक देवकते यांनी मार्च २०२१ मध्ये अशी कोणतीही सभा झाली नसल्याचे आणि कोणत्याही कर्मचाऱ्याची नियुक्ती केली नसल्याचे लेखी निवेदनात स्पष्ट केले आहे. कलम 36 नुसार आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
आर्थिक गैरव्यवहार: चरणगाव ग्रामपंचायतीच्या (Charangaon Gram Panchayat) आठवडी बाजार, गावठाण हर्रासी, घरकर आणि आरओ प्लँटची वसुलीची रक्कम ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा न करता परस्पर खर्च केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यामुळे मुंबई ग्रामपंचायत (ग्रामनिधीची अभिरक्षा व गुंतवणूक) नियम १९५९ मधील तरतुदींचा भंग झाल्याचे म्हटले आहे.
बनावट नोंदी आणि दस्तऐवज: सरपंच यांनी मासिक सभांच्या खोट्या नोटीसेस तयार केल्या आणि सदस्यांना त्या दिल्या नाहीत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने स्वतःवर दबाव आणून मासिक सभांच्या इतिवृत्तावर सह्या केल्याचा लेखी जबाब दिला आहे. या सर्व बाबींवरून बनावट दस्तऐवज तयार केल्याचे दिसून येते.
पुढील कार्यवाही: अमरावती येथील अपर आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी, अकोला यांना (Charangaon Gram Panchayat) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३६ नुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, आता जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असून, या आरोपांवरून सरपंच पदावर कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
प्रतिक्रिया : विनोद देशमुख माजी .जिल्हा परिषद सदस्य अखेर सत्याला न्याय मिळाला कामामध्ये अनियमितता व गावाचा विकास न करणे भोवले, सत्याचा विजय