परभणी (Parbhani):- शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडी दरम्यान काहींनी आपसात सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करत वाद केला. सार्वजनिक शांततेचा भंग करण्यात आला. ही घटना २ डिसेंबर रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास परभणी तालुक्यातील दुर्डी येथील जिल्हा परिषद (zilha parishad)शाळेच्या आवारात घडली. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
परभणी ग्रामीण पोलिसात गुन्ह्याची नोंद
पोलीस अंमलदार देवीदास बुकरे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे डायल ११२ वर सेवेवर असताना त्यांना दुर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवरुन वाद सुरू असल्याची माहिती मिळाली. यानंतर फिर्यादी नमुद ठिकाणी गेले. अध्यक्षाची निवड झाल्यानंतर उपाध्यक्ष निवडी दरम्यान काही व्यक्तींनी आपसात वाद करुन सार्वजनिक शांततेचा भंग केला. घटनेची माहिती फिर्यादीने आपल्या वरिष्ठांना दिली. या प्रकरणी पंढरीनाथ खोडवे, बळीराम खोडवे, ज्ञानेश्वर खोडवे, सुदाम चोपडे, सुंदर चोपडे, देवीदास चोपडे यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.