प्रवेशासह इतरही खर्च!
नागपूर (School Supplies) : नवीन शैक्षणिक सत्र जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणार असून यासाठी तयारी आधीच सुरूझाली आहे. शाळेच्याफीसह पुस्तके, नोटबुक, गणवेश, टिफिन बॉक्स, शूज इत्यादींच्या खर्चाने पालकवर्ग मेटाकुटीस येणार आहे. तर शिक्षण संस्थांची तिजोरी भरणार आहे.
शाळेच्या फीमध्ये वाढ झाल्याने पालकांच्या खिशावर थेट परिणाम!
खासगी शाळांनी (Private School) वार्षिक शुल्क 10 टक्के वाढवले आहे. व्हॅन, बस आणि ऑटोदेखील त्यांचे भाडे वाढवतील. याचा अर्थ असा की या महिन्यात पालकांची आर्थिक (Financial) घडी विस्कळीत होणार आहे. विदर्भ वगळता राज्याच्या इतर भागात राज्य मंडळाच्या शाळा 15 जूनपासून सुरू होतील. तर विदर्भात 23 जूनपासून शाळेची पहिली घंटा वाजेल. सीबीएसई बोर्डाच्या प्राथमिक शाळाही 20 तारखेनंतरच सुरू होतील. तर माध्यमिक शाळा 15 जूनपासून सुरू होतील. नेहमीप्रमाणे यावेळी शाळांनी त्यांच्या फीमध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. फी वाढीचे कारण शिक्षकांच्या पगारात वाढ असल्याचे सांगितले जात आहे. शाळेच्या फीमध्ये वाढ झाल्याने पालकांच्या खिशावर थेट परिणाम होईल. जूनमध्ये केवळ शाळेची फीच नव्हेतर मुलांचे गणवेश, पुस्तके, नोटबुक आणि इतर साहित्यांवर खर्च होईल. स्टेशनरीच्या (Stationery) किमतीतही 10-15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूणच शिक्षणावर महागाईचे (Education Inflation) संकट कोसळल्याची स्थिती आहे.
नवीन शिक्षण धोरण लागू झाल्यानंतर, पहिलीच्या वर्गाची पुस्तके बदलतील!
शाळा सुरू होण्यास अद्याप वेळ असला तरी, सध्या खर्चाचे ‘गणित’ केले जात आहे. मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी घरगुती खर्चातही कपात केली जात आहे. नवीन शिक्षण धोरण लागू झाल्यानंतर, यावेळी पहिलीच्या वर्गाची पुस्तके बदलतील. नवीन पुस्तकांच्या किमतीही (Books Prices) जास्त असतील. त्यासाठीची तयारीही आतापासूनच करावी लागणार आहे. बाजारात प्रत्येक वस्तूच्या किमती वाढल्या आहेत. टिफिन बॉक्स आणि पाण्याच्या बाटलीसह एका बॅगची किंमत 500 रुपयांपेक्षा जास्त आहे. स्कूल बॅगच्या किमतीही 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
शिकवणी वर्गाचाही खर्च!
शाळा सुरूहोताच मुलांच्या शिकवण्याही सुरू होतील. शिकवण्यांसाठीही आगाऊ रक्कम (Fees) द्यावी लागणार आहे. तर नववीनंतर होणाऱ्या शिकवणी आणि कोचिंगसाठी बुकिंग आधीच झाले आहे. काही ठिकाणी एकरकमी रक्कम भरणे आवश्यक झाले आहे. एकूणच शालेय शिक्षणासह महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च पालकांच्या (Parents) आवाक्याबाहेरचा झाला आहे.