मंत्री मेघनाताई बोर्डीकर माय-बाप ज्येष्ठ नागरिकांची मुख्यमंत्र्यांकडे शिष्टाई करणार!
नांदेड (Senior Citizens) : राज्यमंत्री ना.मेघनाताई बोर्डीकर (Minister of State Meghnatai Bordikar) यांच्या नांदेड दौऱ्यामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. १७ ऑक्टोबर रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘आरोग्य संवाद’ कार्यक्रमासाठी त्या नांदेडला आल्या होत्या. या संधीचा फायदा घेत उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेसकाॅम संघटनेचे नेते डॉ. हंसराज वैद्य (Dr. Hansraj Vaidya) व डॉ. शितल भालके (Dr. Sheetal Bhalke) यांनी त्यांची भेट घेऊन ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांवर सखोल चर्चा केली.
ज्येष्ठ नागरिकांच्या १२ प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर!
डॉ. वैद्य आणि डॉ. भालके यांनी मंत्री महोदयांना ज्येष्ठ नागरिक समूह हा एकूण मतदारांच्या २०% असून, हा गट स्वातंत्र्य लढ्यापासून ते आजतागायत न चुकता १००% मतदान करणारा, निर्मोही तथा निर्णायक ‘वोट बँक’ आहे, हे विशद केले. हे ज्येष्ठ नागरिक देशाचे आधारवड, शिल्पकार आणि खरी ‘राष्ट्रीय संपत्ती’ असून त्यांचे जतन करणे आपले परम कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.या भेटीदरम्यान, शिष्टमंडळाने मंत्री महोदयांना ज्येष्ठ नागरिकांच्या १२ प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले.
मंत्रीमंडळात ‘ज्येष्ठ नागरिक खात्याचा मंत्री’ असे पद व खाते स्थापन करावे!
त्यात शासनाने ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० वर्षेच ग्राह्य धरावे,गरीब, गरजवंत तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना शेजारच्या राज्याप्रमाणे प्रतीमहा किमान पाच हजार रुपये थेट खात्यावर जमा करावेत,२००७ चा कायदा, २०१०चे नियम आणि २०१३ चे धोरण व कायदा तंतोतंत अंमलात आणावेत, ‘मुख्यमंत्री लाडके माय-बाप योजना’ त्वरित कार्यान्वित करावी,ज्येष्ठ नागरिकांना ‘राष्ट्रीय संपत्ती’ म्हणून घोषित करावे, मंत्रीमंडळात ‘ज्येष्ठ नागरिक खात्याचा मंत्री’ असे पद व खाते स्थापन करावे अशा एकूण १२ मागण्याचे निवेदन राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांना दिले आहे.
समाधानाचे आणि आशेचे वातावरण!
मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी या सर्व मागण्यांची नोंद घेतली असून, मुख्यमंत्र्यांकडे यासंबंधी शिफारस पत्र देण्याचे आणि पाठपुरावा करण्याचे मान्य केले आहे.मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या या सकारात्मक शिष्टाईमुळे राज्यातील माय-बाप ज्येष्ठ नागरिकांना (Citizens) आगामी दिवाळीपूर्वीच त्यांच्या मागण्या मान्य होऊन मोठी सप्रेम भेट मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नागरिक समूहात यामुळे समाधानाचे आणि आशेचे वातावरण पसरले आहे.